< ၂ ရာဇဝင်ချုပ် 33 >
1 ၁ (note: verses missing) ပျောက်ဆုံး
१मनश्शे यहूदाचा राजा झाला तेव्हा बारा वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेमध्ये पंचावन्न वर्षे राज्य केले.
२त्यांचे आचरण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे होते. वाईट वर्तणुकीमुळे ज्या देशांना परमेश्वराने इस्राएलपुढून हुसकून लावले त्यांच्या निंद्य प्रथांचेच मनश्शेने अनुकरण केले
३हिज्कीयाने जी उंचस्थाने उद्ध्वस्त केली होती तिच मनश्शेने पुन्हा बांधली. त्याने बआल देवतांसाठी वेद्या केल्या आणि अशेराचे स्तंभ उभे केले. नक्षत्रांपुढे नतमस्तक होऊन तो त्या तारांगणांची पूजाही करत असे.
४परमेश्वराच्या मंदिरात त्याने त्या इतर दैवतांसाठी वेद्या बांधल्या. “माझे नाव यरूशलेमामध्ये चिरकाल राहील” असे याच मंदिराबद्दल परमेश्वराने म्हटले होते.
५या परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणांत मनश्शेने सर्व नक्षत्रांसाठी वेद्या बांधल्या.
६बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने आपल्या पोटच्या पुत्रांचा यज्ञात बली दिला. जादूटोणा, चेटूक यातही तो पारंगत होता. चेटूक करणारे आणि मृतात्म्याशी संबंध ठेवणारे यांच्याशी मनश्शेचे संबंध होते. परमेश्वराने निषिध्द मानलेली बरीच कृत्ये मनश्शेने केली. त्याच्या या गैरवर्तनामुळे परमेश्वराचा संताप झाला.
७मनश्शेने एका कोरीव मूर्तीची स्थापनाही देवाच्या मंदिरात केली. या मंदिराविषयी दावीद व त्याचा पुत्र शलमोन यांना देव असे म्हणाला होता, “या मंदिरात आणि यरूशलेमेमध्ये माझे नाव चिरकाल राहील. इस्राएलच्या सर्व कुळांमधून मी यरूशलेमेला निवडले.
८त्यांच्या पूर्वजांना कबूल केलेल्या प्रदेशातून मी आता इस्राएल लोकांस बाहेर पडू देणार नाही. पण त्यांना दिलेल्या आज्ञा मात्र त्यांनी कसोशीने पाळल्या पाहिजेत. मोशेद्वारे त्यांना दिलेल्या विधी, नियम व आज्ञा त्यांनी पाळायला हवेत.”
९मनश्शेने मात्र यहूदा लोक आणि यरूशलेमचे लोक यांना दुराचरणाला प्रवृत केले. इस्राएल लोकांपूर्वी ज्या राष्ट्रांना परमेश्वराने हुसकावून लावले त्यांच्यापेक्षाही हे लोक दुराचरणी होते.
१०परमेश्वर मनश्शेशी व इतर लोकांशी बोलला पण कोणीही परमेश्वराचे ऐकले नाही.
११तेव्हा अश्शूरच्या राजाच्या सेनापतीकरवी परमेश्वराने यहूदावर हल्ला केला. या सेनापतींनी मनश्शेला आकड्यांनी जखडून पकडले. त्याच्या हातात पितळी बेड्या ठोकल्या. अशा रीतीने मनश्शेला कैद करून त्यांनी बाबेलला नेले.
१२मनश्शेचे हाल झाले तेव्हा त्याने परमेश्वर देवाची करुणा भाकली. त्याच्या पूर्वजांच्या देवासमोर मनश्शे नम्र झाला.
१३त्याने देवाची प्रार्थना केली व मदतीसाठी याचना केली. मनश्शेचा धावा ऐकून परमेश्वरास त्याची दया आली. म्हणून त्यास पुन्हा यरूशलेमेला आणून परमेश्वराने त्यास गादीवर बसवले. परमेश्वर हाच खरा देव आहे हे तेव्हा मनश्शेला पटले.
१४या घटनेनंतर मनश्शेने दावीद नगराभोवती आणखी एक कोट बांधला. हा कोट गीहोनच्या पश्चिमेकडील खोऱ्यात मासळी दरवाजाजवळ ओफेल टेकडी सभोवती असून खूप उंच होता. यहूदामधील सर्व तटबंदीच्या नगरांमध्ये त्याने अधिकारी नेमले.
१५परक्या देवतांच्या मूर्ती त्याने हटवल्या. परमेश्वराच्या मंदिरातील मूर्ती काढून टाकली. मंदिराच्या टेकडीवर तसेच यरूशलेमामध्ये बांधलेल्या वेद्यांही काढून यरूशलेम नगराबाहेर टाकून दिल्या.
१६नंतर त्याने परमेश्वराची वेदी स्थापन केली आणि त्यावर शांत्यर्पणे आणि उपकारस्मरणाची अर्पणे वाहिली. समस्त यहूदी लोकांस त्याने इस्राएलाचा परमेश्वर देव याची उपासना करायची आज्ञा केली.
१७लोक अजूनही उंचस्थानी यज्ञ करीतच होते पण आता ते फक्त त्यांच्या परमेश्वर देवाप्रीत्यर्थ करीत होते.
१८मनश्शेची बाकीची कृत्ये तसेच त्याने केलेली देवाची प्रार्थना तसेच परमेश्वर देवाच्यावतीने द्रष्टे त्याच्याशी जे बोलले ती वचने हे सगळे इस्राएलच्या राजांच्या बखरीत लिहिलेले आहे.
१९मनश्शेची प्रार्थना आणि परमेश्वरास त्याचे गाऱ्हाणे ऐकून करुणा वाटणे हे द्रष्टयांच्या बखरीत आहे. मनश्शेला उपरती होण्यापूर्वीची त्याची पापे व वाईट काम, उंचस्थाने व अशेरा स्तंभ जिथे उभारले ती स्थाने कोरीव मूर्ती याचेही तपशील याच बखरीत आहेत.
२०पुढे मनश्शे मरण पावला व पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याच्या राजमहालातच लोकांनी त्यास पुरले. त्याच्या जागी त्याचा पुत्र आमोन राज्य करु लागला.
२१आमोन बाविसाव्या वर्षी यहूदाचा राजा झाला. तो यरूशलेमेमध्ये दोन वर्षे गादीवर होता.
२२परमेश्वराच्या दृष्टीने निषिध्द अशी कृत्ये त्याने केली. आपले पिता मनश्शे यांच्याप्रमाणेच तो परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागला. पित्यानी करून घेतलेल्या कोरीव मूर्तीपुढे यज्ञ करून आमोनाने त्यांची पूजा केली.
२३पुढे त्याचे पिता मनश्शे जसे परमेश्वरास नम्रपणे शरण गेले तसा तो गेला नाही. उलट आमोनाची दुष्कृत्ये वाढतच चालली.
२४आमोनच्या सेवकांनी कट रचून त्याची त्याच्या महालातच हत्या केली.
२५पण राजा आमोन विरुध्द कारस्थान करणाऱ्यांचा यहूदी लोकांनी काटा काढला. मग आमोनचा पुत्र योशीया याला लोकांनी राजा केले.