< स्तोत्रसंहिता 145 >
1 १ दाविदाचे स्तोत्र माझ्या देवा, हे राजा, मी तुझी खूप स्तुती करीन; मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचा धन्यवाद करीन.
2 २ प्रत्येक दिवशी मी तुझा धन्यवाद करीन. मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचे स्तवन करीन.
3 ३ परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे; त्याची महानता अनाकलनीय आहे.
4 ४ एक पिढी दुसऱ्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, आणि तुझ्या पराक्रमी कृतीचे वर्णन करतील.
5 ५ ते तुझ्या राजवैभवाचा गौरवयुक्त प्रतापाविषयी बोलतील, मी तुझ्या अद्भुत कार्यांचे मनन करीन.
6 ६ ते तुझ्या भयावह कृत्यांच्या पराक्रमाविषयी बोलतील, मी तुझ्या महिमेचे वर्णन करीन.
7 ७ ते तुझ्या विपुल अशा चांगुलपणाविषयी सांगतील, आणि तुझ्या न्यायीपणाबद्दल गाणे गातील.
8 ८ परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे, तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे.
9 ९ परमेश्वर सर्वांना चांगला आहे; त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.
10 १० हे परमेश्वरा, तू केलेली सर्व कृत्ये तुला धन्यवाद देतील; तुझे भक्त तुला धन्यवाद देतील.
11 ११ ते तुझ्या राज्याच्या गौरवाविषयी सांगतील, आणि तुझ्या सामर्थ्याविषयी बोलतील.
12 १२ हे यासाठी की, त्यांनी देवाची पराक्रमी कृत्ये आणि त्याच्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस कळवावी.
13 १३ तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. आणि तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे.
14 १४ पडत असलेल्या सर्वांना परमेश्वर आधार देतो, आणि वाकलेल्या सर्वांना तो उभे करतो.
15 १५ सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात. आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस.
16 १६ तू आपला हात उघडून प्रत्येक जिवंत प्राण्याची इच्छा तृप्त करतो.
17 १७ परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे; आणि तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे.
18 १८ जे कोणी त्याचा धावा करतात, जे सत्यतेने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.
19 १९ तो त्याचे भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो; तो त्यांची आरोळी ऐकून त्यांना वाचवतो.
20 २० परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो. परंतु तो वाईटांचा नाश करतो.
21 २१ माझे मुख परमेश्वराची स्तुती करील. सर्व मानवजात त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद सदासर्वकाळ व कायम करो.