< गणना 3 >
1 १ जेव्हा परमेश्वर सीनाय पर्वतावर मोशेशी बोलला त्याकाळचा अहरोन व मोशे ह्याच्या वंशावळीचा इतिहास आता हा असाः
2 २ अहरोनाच्या मुलांची नावे हीः नादाब हा प्रथम जन्मलेला, व अबीहू, एलाजार व इथामार.
3 ३ अहरोनाचे हे पुत्र जे अभिषेक केलेले याजक होते, ज्यांना त्याने याजकपदात सेवा करण्यासाठी समर्पित केले, त्यांची नावे ही आहेत
4 ४ परंतु नादाब व अबीहू परमेश्वराची सेवा करिताना सीनाय रानात परमेश्वरापुढे अस्विकारनीय अग्नी अर्पिला तेव्हा ते परमेश्वरापुढे मरण पावले. त्यांना पुत्र नव्हते म्हणून एलाजार व इथामार हे आपला बाप अहरोन हयात असताना याजक होऊन परमेश्वराची सेवा करीत असत.
5 ५ परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
6 ६ लेवीच्या वंशाला आण आणि त्यांना अहरोन याजकासमोर त्यास मदत करण्यास हजर कर.
7 ७ अहरोन व सर्व मंडळी दर्शनमंडपामध्ये सेवा करीत असता लेवी लोक त्यांना मदत करतील. त्यांनी निवासमंडपात सेवा करावी.
8 ८ त्यांनी दर्शनमंडपामधील सर्व वस्तूंची काळजी घ्यावी आणि इस्राएल वंशांना निवासमंडपाच्या सेवेत त्यांना सामान वाहण्यास मदत करावी.
9 ९ अहरोन व त्याच्या मुलांना तू लेवींच्या हाती दे. इस्राएल लोकांची सेवा करण्यासाठी त्यांना पूर्णपणे मदतीसाठी देण्यात आले आहे.
10 १० “अहरोन व त्याचे पुत्र यांची याजक म्हणून नेमणूक कर. त्यांनी याजक म्हणून आपले सेवेचे काम करावे. कोणी परका जवळ आल्यास त्यास जिवे मारावे.”
11 ११ परमेश्वर मोशेशी बोलला तो म्हणाला,
12 १२ पाहा, मी इस्राएल लोकांतील प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी मी आता माझी सेवा करण्यासाठी लेवी वंशातील लोकांस निवडून घेत आहे. लेवी माझेच असतील.
13 १३ “सर्व प्रथम जन्मलेले माझेच आहेत. मी मिसर देशात सर्व प्रथम जन्मलेल्यांना मारून टाकले. त्याच दिवशी इस्राएल लोकांतील पुरुषांपैकी व पशूपैकी प्रथम जन्मलेले सर्व मी आपणासाठी पवित्र ठरवले. ते माझेच आहेत. मी परमेश्वर आहे.”
14 १४ परमेश्वर सीनाय रानात पुन्हा मोशेशी बोलला. तो म्हणाला,
15 १५ “लेवी वंशातील जितके पुरुष व एक महिन्याचे किंवा त्याहून अधिक वयाची मुले असतील त्यांची, त्यांच्या कुळाप्रमाणे व त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर.”
16 १६ मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यास झालेल्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्यांची गणती केली.
17 १७ लेवींच्या मुलांची नावे गेर्षोन, कहाथ व मरारी होते.
18 १८ गेर्षोनाच्या मुलांची नावे त्यांच्या कुळावरून ही आहेत. लिब्नी व शिमी.
19 १९ कहाथाचे पुत्र त्यांच्या कुळाप्रमाणे हे: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जियेल.
20 २० मरारीचे पुत्र त्यांच्या कुळाप्रमाणे हे: महली व मूशी. ही लेवी कुळातील घराणी होत.
21 २१ गेर्षोनापासून लिब्नी व शिमी ही कुळे चालू झाली ही गेर्षोनी कुळे.
22 २२ या दोन कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष मिळून सात हजार पाचशे होते.
23 २३ गेर्षोन कुळांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे पश्चिमेच्या बाजूस पवित्र निवासमंडपाच्या मागे आपले डेरे दिले.
24 २४ लायेलाचा मुलगा एल्यासाप हा गेर्षोनी घराण्याचा सरदार होता.
25 २५ दर्शनमंडपामधील निवासमंडप, तंबू आणि त्यावरील आच्छादन, दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा यांची निगा राखण्याचे काम गेर्षोनी लोकांवर सोपविण्यात आले.
26 २६ पवित्र निवासमंडप व वेदी ह्यांच्या सभोंवतीच्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या दाराचा पडदा, त्यांच्यासाठी लागणारे तणावे व इतर सामान यांची निगा राखण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.
27 २७ कहाथापासून अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जियेल ही कुळे चालू झाली; ही कहाथी कुळे.
28 २८ या कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष आठ हजार सहाशे होते. पवित्रस्थळातील वस्तूची निगा राखण्याचे काम कहाथी कुळांना देण्यात आले.
29 २९ कहाथी कुळांनी निवासमंडपाच्या दक्षिणेस आपली छावणी उभारली.
30 ३० उज्जियेलाचा मुलगा अलीसापान हा कहाथी घराण्याचा पुढारी होता.
31 ३१ पवित्र कराराचा कोश, मेज, दीपस्तंभ, वेद्या, पवित्रस्थानाची सेवेसाठी असलेली पात्रे, पडदा व इतर सर्व वस्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.
32 ३२ अहरोनाचा मुलगा एलाजार याजक हा लेवी लोकांच्या पुढऱ्यांचा पुढारी होता. पवित्र वस्तूचे रक्षण करण्याचे काम ज्यांच्यावर सोपवले होते त्या सर्वांवर देखरेख करणारा तो प्रमुख होता.
33 ३३ मरारीपासून महली व मुशी ही घराणी चालू झाली ही मरारी कुळे.
34 ३४ या कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष सहा हजार दोनशे होते.
35 ३५ अबीहाईलाचा मुलगा सूरीएल हा मरारी घराण्याचा पुढारी होता. या कुळांना पवित्र निवासमंडपाच्या उत्तरेकडचा भाग दिला होता तेव्हा त्यांनी तेथे आपली छावणी ठोकली.
36 ३६ मरारी वंशातील लोकांस पवित्र निवासमंडपाच्या फळ्या व त्यांचे सर्व अडसर, खांब व उथळ्या आणि पवित्र निवासमंडपाच्या फळ्यांशी निगडीत अशा सर्व वस्तूंची निगा राखण्याचे काम देण्यात आले;
37 ३७ तसेच पवित्र निवासमंडपाच्या अंगणासभोंवतीचे सर्व खांब, त्यांच्या बैठका, उथळ्या, मेखा आणि तणाव्याचे दोर यांची ही देखभाल करण्याचे काम त्यांनी घेतले.
38 ३८ मोशे, अहरोन व त्याचे पुत्र यांची छावणी दर्शनमंडपाच्या समोर असलेल्या पवित्र निवासमंडपाच्या पूर्वेस होती. इस्राएल लोकांच्यावतीने पवित्र निवासस्थानाच्या रक्षणाचे काम त्यांना देण्यात आले. सर्व इस्राएलाकरिता त्यांनी हे काम केले. कोणी दुसरा पवित्र निवासस्थानाजवळ आल्यास त्यास जिवे मारावे असा त्यांना आदेश होता.
39 ३९ लेवी वंशातील एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष यांची गणती करण्यास परमेश्वराने मोशे व अहरोन ह्याना सांगितले, तेव्हा पुरुष लेवीची एकूण संख्या बावीस हजार भरली.
40 ४० परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांपैकी जितके प्रथम जन्मलेले, एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष असतील त्यांच्या नांवाची एक यादी तयार कर;
41 ४१ आता मी इस्राएलाचे प्रथम जन्मलेले पुत्र व पुरुष घेणार नाही, त्याऐवजी मी परमेश्वर, लेवी वंशाचे लोक घेईन, तसेच इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या पशूंच्या ऐवजी लेवी लोकांच्या पशूंचे प्रथम जन्मलेले घेईन.”
42 ४२ तेव्हा मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले, त्याने इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वाची गणती केली.
43 ४३ मोशेने प्रथम जन्मलेले एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे जे इस्राएल पुत्र व पुरुष होते त्यांच्या नांवाची यादी केली. त्या यादीत बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर नांवे होती.
44 ४४ परमेश्वर मोशेशी पुन्हा बोलला. तो म्हणाला,
45 ४५ इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या ऐवजी तू लेवी लोक घे आणि इस्राएलांच्या पशू ऐवजी लेवी लोकांचे पशू घे, कारण लेवी माझेच आहेत. मी परमेश्वर आहे.
46 ४६ लेवी लोक बावीस हजार आहेत आणि इस्राएल लोकांच्या कुळात प्रथम जन्मलेले बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर आहेत. म्हणजे इस्राएलातील प्रथम जन्मलेल्यांपैकी दोनशे त्र्याहत्तर पुत्र अधिक शिल्लक राहतात.
47 ४७ त्यांना सोडवून घेण्यासाठी प्रत्येकाकडून पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे पाच पाच शेकेल घे. एक शेकेल म्हणजे वीस गेरा.
48 ४८ प्रथम जन्मलेल्यांच्या सोडवणुकीचे जे अधिक पैसे येतील तो पैसा अहरोन व त्याच्या मुलांना दे.
49 ४९ आणि लेव्यांकडून ज्यांची खंडणी झाली त्यांच्याहून जे अधिक होते त्यांच्यापासून त्यांच्या खंडणीचा पैसा मोशेने घेतला.
50 ५० इस्राएलांच्या प्रथम जन्मलेल्याकडून त्याने जे पैसे घेतले अधिकृत पवित्रस्थानातील चलनाप्रमाणे मोशेने एकूण एक हजार तीनशे पासष्ट शेकेल भरले.
51 ५१ मोशेने खंडणीचे पैसे अहरोन व त्याच्या मुलांना दिले. जशी परमेश्वराने त्यास आज्ञा केली होती ती प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या वचनानुसार मोशेने केली.