< गणना 28 >
1 १ परमेश्वर मोशेशी बोलला आणि म्हणाला,
2 २ इस्राएल लोकांस आज्ञा दे आणि त्यांना सांग की, माझे अर्पण, म्हणजे मला मधुर सुवासाची अग्नीतून केलेली माझी अर्पणे यासाठी माझे अन्न, तुम्ही त्यांच्या नेमलेल्या वेळी अर्पणे करण्यास जपा.
3 ३ आणखी तू त्यांना सांग, अग्नीतून केलेले अर्पण त्यांनी परमेश्वरास अर्पावे ते हे आहेः त्यांनी नेहमी होमार्पणासाठी रोज एक एक वर्षाची दोन निर्दोष नर कोकरे.
4 ४ एक कोकरू सकाळी आणि दुसरे संध्याकाळी अर्पण करावे.
5 ५ हातकुटीच्या पाव हिन तेलात मळलेल्या एक दशमांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे.
6 ६ हे नित्याचे होमार्पण, सीनाय पर्वतावर नेमलेले, परमेश्वरास सुवासासाठी अग्नीतून केलेले असे अर्पण आहे.
7 ७ त्याबरोबरचे पेयार्पण एका कोकरामागे पाव हिन असावे, म्हणजे परमेश्वरासाठी पवित्रस्थानी मदिरेचे पेयार्पण तू ओतावे.
8 ८ दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे. जसे सकाळचे अन्नार्पणाप्रमाणे व त्याबरोबरची पेयार्पणे तसे ते परमेश्वरास मधुर सुवासाचे, अग्नीतून केलेले अर्पण असे अर्पण कर.
9 ९ “प्रत्येक शब्बाथ दिवशी एक एक वर्षाचे दोन निर्दोष नर कोकरे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ व त्याबरोबरची पेयार्पण ही अर्पावी.
10 १० नेहमीचे होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण याखेरीज आणखी हा होमार्पण प्रत्येक शब्बाथ दिवशी अर्पावा.”
11 ११ प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही परमेश्वरास होमार्पणे करावे. या अर्पणात दोन बैल, एक मेंढा आणि एक वर्षाच्या सात मेंढ्या असतील. त्या मेंढ्या दोषरहित असाव्यात.
12 १२ प्रत्येक बैलामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले तीन दशमांश एफा सपीठ आणि प्रत्येक मेंढ्यामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ.
13 १३ आणि प्रत्येक कोकराबरोबर अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशमांश एफा सपीठ अर्पावे. हे होमार्पण, मधुर सुवासाचे परमेश्वरास अग्नीतून केलेले अर्पण असे आहे.
14 १४ लोकांची पेयार्पणे ही प्रत्येक बैलाकरता अर्धा हीन, व प्रत्येक मेंढ्याकरता एकतृतीयांश हीन व प्रत्येक कोकऱ्याकरता एक चतुर्थाश हीन इतका द्राक्षरस असावा, वर्षातील प्रत्येक महिन्यात हे होमार्पण करावे.
15 १५ आणि निरंतरचे होमार्पण व त्याचे पेयार्पण याखेरीज परमेश्वरास पापार्पणासाठी शेरडातला एक बकरा अर्पावा.
16 १६ परमेश्वराचा वल्हांडण सण महिन्याच्या चौदाव्या दिवशी आहे.
17 १७ बेखमीर भाकरीचा सण महिन्याच्या पंधराव्या दिवशी सुरु होतो. हा सण सात दिवस असेल. खमीराशिवाय केलेली भाकरीच फक्त तुम्ही खाऊ शकता.
18 १८ या सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही खास सभा बोलावली पाहिजे. त्यादिवशी तुम्ही कसलेही काम करायचे नाही.
19 १९ तुम्ही परमेश्वरास होमार्पणे द्याल. या अर्पणात दोन बैल, एक मेंढा आणि एक वर्षाची सात कोकरे असतील. ती दोषरहित असावीत.
20 २० त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे. गोऱ्ह्यामागे तीन दशमांस एफा आणि त्या मेंढ्याच्यामागे दोन दशमांस एफा,
21 २१ आणि सात कोकरापैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा अर्पावे.
22 २२ तुम्ही एक बकराही अर्पण केला पाहिजे. तुम्हास शुद्ध करण्यासाठी देण्यात येणारे ते पापार्पण असेल.
23 २३ सकाळचे होमार्पण जे निरंतरचे होमार्पण आहे त्याव्यतिरिक्त हे अर्पण करावे.
24 २४ याप्रमाणे वल्हाडणाचे सात दिवस दररोज परमेश्वरास मधुर सुवासाचे, अग्नीतून केलेल्या अर्पणाचे अन्न अर्पण करा, निरंतरचे होमार्पणे आणि त्याचे पेयार्पण याव्यतिरिक्त हे अर्पण असावे.
25 २५ नंतर या सणाच्या सातव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा आणि तुम्ही त्यादिवशी काहीही अंगमेहनीतीचे काम करू नये.
26 २६ सप्ताहांच्या सणात प्रथम पीक अर्पिण्याच्या दिवशी तुम्ही परमेश्वरास नव्या अन्नाचे अर्पण कराल त्यावेळी तुम्ही एक पवित्र मेळा बोलवा त्यादिवशी तुम्ही कसलेही अंगमेहनीतीचे काम करू नये.
27 २७ तुम्ही परमेश्वरास सुवासासाठी होमार्पणे म्हणून तुम्ही दोन गोऱ्हे, एक मेंढा व एक एक वर्षाचे सात कोकरे अर्पण करा.
28 २८ आणि त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे. प्रत्येक गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा व मेंढ्यामागे दोन दशमांश एफा द्यावे.
29 २९ व त्या सात कोकराबरोबर एक दशमांश एफा सपीठ अर्पावे.
30 ३० आणि तुम्हासाठी प्रायश्चित करायला एक बकरा अर्पावा.
31 ३१ आणि निरंतरचे होमार्पण व अन्नार्पणाशिवाय ते अर्पण करावे. जेव्हा ते प्राणी तुम्हासाठी अर्पण करायचे ते निर्दोष असावे; त्याबरोबरची पेयार्पणे सुद्धा अर्पावी.