< मार्क 8 >
1 १ त्या दिवसात पुन्हा लोकांचा मोठा समुदाय जमला व त्यांच्याजवळ खावयास काही नव्हते. येशूने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यांना म्हणाला,
2 २ “मला या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काही नाही.
3 ३ मी जर त्यांना उपाशी घरी पाठवले तर ते रस्त्यातच कासावीस होऊन पडतील आणि त्यांच्यातील काही तर दुरून आले आहेत.”
4 ४ त्याच्या शिष्यांनी उत्तर दिले, “येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कोठून आणाव्यात?”
5 ५ त्याने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात.”
6 ६ त्याने लोकांस जमिनीवर बसण्याची आज्ञा केली. त्याने सात भाकरी घेतल्या, आभार मानले व त्या मोडल्या व आपल्या शिष्यांजवळ त्या वाढण्यास दिल्या आणि त्यांनी त्या लोकांस वाढल्या.
7 ७ त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते, त्यास त्याने आशीर्वाद देऊन तेही वाढावयास सांगितले.
8 ८ ते जेवून तृप्त झाले व उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या त्यांनी भरल्या.
9 ९ तेथे सुमारे चार हजार पुरूष होते. मग येशूने त्यांना घरी पाठवले.
10 १० आणि लगेच तो आपल्या शिष्यांसह तारवात बसला व दल्मनुथा प्रदेशात गेला.
11 ११ मग काही परूशी येऊन त्याच्याशी वाद घालू लागले. त्याची परीक्षा पाहावी म्हणून त्यांनी त्यास स्वर्गातून चिन्ह मागितले.
12 १२ आपल्या आत्म्यात दीर्घ उसासा टाकून तो म्हणाला, “ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हास खरे सांगतो की, या पिढीला चिन्ह दिले जाणार नाही.”
13 १३ नंतर तो त्यांना सोडून पुन्हा तारवात जाऊन बसला व सरोवराच्या पलीकडच्या बाजूस गेला.
14 १४ तेव्हा शिष्य भाकरी आणण्याचे विसरले होते आणि तारवात त्यांच्याजवळ एकच भाकर होती.
15 १५ येशूने त्यांना निक्षून सांगितले, “सांभाळा, परूश्यांचे खमीर व हेरोदाचे खमीर यापासून सावध राहा.”
16 १६ मग ते आपसात चर्चा करू लागले की, “आपल्याजवळ भाकरी नाहीत म्हणून तो बोलला की काय?”
17 १७ ते काय बोलत होते हे ओळखून येशू त्यास म्हणाला, “आपणाजवळ भाकरी नाहीत याविषयी चर्चा का करता? अजून तुमच्या लक्षात आले नाही काय व तुम्हास समजूनही समजत नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय?
18 १८ डोळे असून तुम्हास दिसत नाही काय? कान असून तुम्हास ऐकू येत नाही काय? तुम्हास आठवत नाही काय?
19 १९ मी पाच हजार लोकांस पाच भाकरी वाटून दिल्या तेव्हा तुम्ही तुकड्यांमधून किती टोपल्या गोळा केल्या.” शिष्यांनी उत्तर दिले, “बारा.”
20 २० “आणि चार हजारांसाठी मी सात भाकरी मोडल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या गोळा केल्या?” शिष्यांनी उत्तर दिले, “सात.”
21 २१ मग येशू त्यांना म्हणाला, “अजूनही तुम्हास समजत नाही काय?”
22 २२ ते बेथसैदा येथे आले. तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व आपण त्यास स्पर्श करावा अशी विनंती केली.
23 २३ मग त्याने आंधळ्याचा हात धरून त्यास गावाबाहेर नेले मग येशू त्या आंधळ्याच्या डोळ्यांवर थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्यास विचारले, “तुला काही दिसते काय?”
24 २४ त्याने वर पाहिले आणि म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत असे वाटते कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरीही ती चालत आहेत.”
25 २५ नंतर येशूने पुन्हा आपले हात त्या मनुष्याच्या डोळ्यावर ठेवले. त्याने डोळे उघडले तेव्हा त्यास दृष्टी आली आणि त्यास सर्वकाही स्पष्ट दिसू लागले.
26 २६ येशूने त्याला, “त्या गावात पाऊल देखील टाकू नको” असे सांगून घरी पाठवून दिले.
27 २७ मग येशू व त्याचे शिष्य फिलीप्पा कैसरीया नामक प्रदेशास जाण्यास निघाले. वाटेत त्याने त्याच्या शिष्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून ओळखतात?”
28 २८ त्यांनी त्यास उत्तर दिले, “काहीजण म्हणतात, तुम्ही बाप्तिस्मा करणारा योहान, तर इतर काही एलीया समजतात, तर दुसरे काही तुम्ही संदेष्ट्यांपैकी एक आहात असे म्हणतात.”
29 २९ मग येशूने त्यांना विचारले, “तुम्हास मी कोण आहे असे वाटते?” पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त आहेस.”
30 ३० येशू शिष्यांना म्हणाला, “मी कोण आहे हे कोणालाही सांगू नका.”
31 ३१ तो त्यांना शिकवू लागला, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी. वडील, मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक यांजकडून नाकारले जावे, त्यास जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे हे होणे अगत्याचे आहे.
32 ३२ त्याने हे स्पष्टपणे सांगितले, तेव्हा पेत्राने येशूला बाजूला घेतले व तो त्यास दटावू लागला.
33 ३३ परंतु येशूने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व पेत्राला धमकावून म्हटले, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! कारण तू देवाच्या गोष्टीकडे लक्ष लावीत नाहीस, तर मनुष्याच्या गोष्टीकडे लक्ष लावतोस.”
34 ३४ नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोकांस बोलावले व त्यांना म्हणाला, “जर कोणाला माझ्यामागे यायचे असेल तर त्याने स्वतःला नाकारावे. आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे.
35 ३५ जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जीवाला मुकेल व जो कोणी माझ्यासाठी व सुवार्तेसाठी जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील.
36 ३६ मनुष्याने सर्व जग मिळविले व आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ?
37 ३७ जीवाच्या मोबदल्यात मनुष्य काय देऊ शकेल?
38 ३८ देवाशी अप्रामाणिक आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.”