< शास्ते 15 >
1 १ काही दिवसानंतर गव्हाच्या हंगामात शमशोन एक करडू घेऊन आपल्या पत्नीला भेटण्यास गेला; तेव्हा तो स्वत: शी म्हणाला, “मी माझ्या पत्नीच्या खोलीत जाईन” परंतु तिच्या पित्याने त्यास आत जाऊ दिले नाही.
2 २ तिचा पिता म्हणाला, “मला वाटले तू तिचा अगदी द्वेष करतोस, म्हणून मी तिला तुझ्या मित्राला देऊन टाकली; तिची लहान बहीण तिच्यापेक्षा सुंदर आहे, आहे की नाही? तिच्याऐवजी तिला घे.”
3 ३ तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला, “या वेळेस मी पलिष्ट्यांची हानी केली, तरी त्यासंबंधी मी निर्दोष राहीन.”
4 ४ शमशोन गेला आणि त्याने जाऊन तीनशे कोल्हे पकडले, आणि शेपटाला शेपूट अशी एकएक जोडीच्या बांधली. नंतर त्याने मशाली घेऊन प्रत्येक जोडीच्या शेपटांमध्ये बांधल्या.
5 ५ मग मशाली पेटवून त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या उभ्या पिकात सोडले, आणि त्यांनी दोन्ही उभे पिके आणि धान्याच्या रचलेल्या सुड्यांसह जाळली आणि त्याबरोबर जैतूनाचे मळेही जाळले.
6 ६ तेव्हा पलिष्ट्यांनी विचारले, “हे कोणी केले?” नंतर त्यांनी म्हटले, “तिम्नाकराचा जावई शमशोन याने केले, कारण त्याने त्याची पत्नी घेऊन त्याच्या मित्राला दिली. मग पलिष्ट्यांनी जाऊन तिला व तिच्या पित्याला आग लावून जाळून टाकले.
7 ७ शमशोन त्यांना म्हणाला, जरी तुम्ही हे केले, तरी त्याचा मी तुमच्याविरुध्द सूड घेईन, आणि ते केल्यानंतरच मग मी थांबेन.”
8 ८ नंतर त्याने त्यांना मांडीवर व कंबरेवर मारून त्यांचे तुकडे तुकडे करून मोठी कत्तल केली. नंतर तो खाली गेला आणि उंच कड्याच्या एटाम दरीत गुहेमध्ये जाऊन राहिला.
9 ९ मग पलिष्टी बाहेर आले आणि त्यांनी यहूदामध्ये येऊन लढाईची तयारी केली, आणि त्यांनी लेहीत त्यांच्या सैन्याची व्यूहरचना केली.
10 १० तेव्हा यहूदी माणसे म्हणाली, “तुम्ही आमच्यावर का हल्ला केला आहे?” तेव्हा ते म्हणाले, “शमशोनाला पकडण्यासाठी म्हणून आम्ही हल्ला केला आहे; त्याने आमच्याशी जसे केले, तसेच त्याच्याशी करण्यासाठी आम्ही आलो आहो.”
11 ११ नंतर यहूदातली तीन हजार माणसे खाली एटाम दरीच्या उंच कड्याजवळ जाऊन शमशोनाला म्हणाली, “पलिष्टी आमच्यावर राज्य करतात, हे तुला माहीत नाही काय? तर तू हे काय केले?” शमशोन त्यांना म्हणाला, “जसे त्यांनी माझे केले, तसे मी त्यांचे केले आहे.”
12 १२ ते शमशोनाला म्हणाले, “आम्ही तुला बांधून पलिष्ट्यांच्या हाती देण्यासाठी आलो आहोत. तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला,” तुम्ही स्वत: मला मारून टाकणार नाही, “अशी माझ्याजवळ शपथ घ्या.”
13 १३ मग त्यांनी त्यास सांगितले की, “नाही, आम्ही फक्त तुला दोरीने बांधू आणि तुला त्यांच्या हाती सोपवू. आम्ही तुला वचन देतो, आम्ही तुला मारून टाकणार नाही.” तेव्हा त्यांनी दोन नव्या दोरांनी त्यास बांधून खडकातून वर नेले.
14 १४ जेव्हा तो लेहीस पोहचला, तेव्हा पलिष्ट्यांनी त्यास पाहून पलिष्टी आनंदाने ओरडू लागले; आणि परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला आणि त्याच्या हातांना बांधलेले दोर ताग जळतो तसे झाले आणि दोर हातातून गळून पडले.
15 १५ नंतर त्यास गाढवाचे ताजे जाभाड सापडले आणि त्याने ते उचलले आणि त्याच्याने एक हजार माणसे मारली.
16 १६ शमशोन म्हणाला, “गाढवाच्या जाभाडाने ढिगावर ढिग, गाढवाच्या जाभाडाने मी हजार माणसे मारली.”
17 १७ शमशोनाने बोलणे संपवल्यावर, आपल्या हातातून ते जाभाड फेकून दिले, यावरुन त्या ठिकाणाचे नाव रामाथ-लेही ठेवले.
18 १८ तेव्हा शमशोनाला फार तहान लागली आणि त्याने परमेश्वरास हाक मारून म्हटले, “तू आपल्या सेवकाला हा मोठा विजय दिला आहे; परंतु आता मी तहानेने मरत आहे आणि न्यायासाठी बेसुंती लोकांच्या हाती पडत आहे.”
19 १९ तेव्हा देवाने लेहीमधील खोलगट जागा दुभंगून फोडली, आणि त्यातून पाणी निघाले; जेव्हा तो ते प्याला, तेव्हा त्यास परत शक्ती आली आणि त्याच्या जीवात जीव आला. यावरुन त्या जागेचे नाव एन-हक्कोरे पडले; ती जागा आजपर्यंत लेहीमध्ये आहे.
20 २० शमशोनाने पलिष्ट्यांच्या काळात इस्राएलाचा वीस वर्षे न्याय केला.