< यहोशवा 8 >
1 १ परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “भिऊ नको, धैर्यहीन होऊ नको; ऊठ, सर्व लढाई करणाऱ्या लोकांस बरोबर घे. आय नगरापर्यंत जा. पाहा, आयचा राजा, त्याचे लोक, त्याचे नगर आणि त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे;
2 २ यरीहो आणि त्याचा राजा यांचे तू केले तेच आय व त्याचा राजा यांचे कर; मात्र त्यातील लूट व गुरेढोरे तुम्ही आपणासाठी लूट म्हणून घ्या; नगराच्या मागे सैन्याला दबा धरून बसव.”
3 ३ त्याप्रमाणे यहोशवाने सर्व योद्ध्यांसह आय नगरावर चढाई करून जाण्याची तयारी केली; त्याने तीस हजार, बलवान, व शूर पुरुष निवडून घेतले आणि त्यांना रात्री पाठवून दिले.
4 ४ त्याने त्यांना अशी आज्ञा केली, “पाहा, नगराच्या मागे जाऊन नगरावर दबा धरून बसा; नगरापासून फार दूर जाऊ नका, पण तुम्ही सर्व तयार राहा.
5 ५ मी आणि माझ्याबरोबरचे सर्व लोक त्या नगराजवळ येऊ. आणि ते पूर्वीप्रमाणे आम्हावर हल्ला करावयाला येतील तेव्हा आम्ही त्यांच्यापुढून पळायला लागू.
6 ६ असे आम्ही त्यांना पळवीत नगराबाहेर दूर नेईपर्यंत ते आमच्या पाठीस लागतील, कारण त्यांना वाटेल, ‘पहिल्याप्रमाणेच आपल्याला घाबरून हे पळ काढीत आहेत.’ याप्रमाणे आम्ही त्यांच्यापुढे पळायला लागू;
7 ७ मग तुम्ही दबा धरणाऱ्यांनी उठून नगर काबीज करावे; कारण तुमचा देव परमेश्वर ते तुमच्या हाती देणार आहे.
8 ८ तुम्ही ते नगर काबीज करताच त्यास आग लावा. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे त्याचे पालन करा; पाहा, मी तुम्हाला आज्ञा केली आहे.”
9 ९ मग यहोशवाने त्यांना रवाना केले. ते आयच्या पश्चिम बाजूला बेथेल व आय यांच्या दरम्यान दबा धरून बसले. परंतु यहोशवा मात्र त्या रात्री आपल्या लोकांबरोबरच झोपला.
10 १० यहोशवा भल्या पहाटेस उठला आणि त्याने सैन्य तयार केले, यहोशवा आणि इस्राएलाचे वडील आणि त्यांनी आय नगरावर हल्ला केला.
11 ११ त्यांच्याबरोबर सर्व योद्धे लढाई करावयाला गेले, आणि आय नगराजवळ पोहचल्यावर त्यांनी त्यासमोर उत्तरेस तळ दिला; ते व आय नगर यांच्यामध्ये एक दरी होती.
12 १२ त्याने सुमारे पाच हजार पुरुष आय नगराच्या पश्चिमेस बेथेल व आय यांच्या दरम्यान दबा धरावयला ठेवले.
13 १३ त्याने नगरांच्या उत्तरेच्या ठिकाणी मुख्य सैन्य आणि पश्चिमेकडे सैन्याचे रक्षण करणारे ठेवून यहोशवा त्या रात्री त्या दरीत राहिला.
14 १४ आयच्या राजाने हे पाहिले तेव्हा तो व त्याच्या नगरातले सगळे लोक पहाटेस लवकर उठून इस्राएलाशी सामना करायला अराबासमोरील यार्देनेच्या दरीकडे गेले. पण नगराच्या पिछाडीस लोक आपणावर दबा धरून आहेत हे त्यांना माहीत नव्हते.
15 १५ यहोशवा व सर्व इस्राएल त्यांच्यासमोर पराजित झाल्याचे सोंग करून रानाच्या वाटेने पळायला लागले.
16 १६ त्यांचा पाठलाग करण्यासाठी आय नगरातल्या सर्व लोकांस एकत्र बोलवण्यात आले; ते यहोशवाचा पाठलाग करीत नगरापासून दूरवर गेले.
17 १७ इस्राएलाचा पाठलाग करायला निघाला नाही असा कोणी पुरुष आय किंवा बेथेल येथे राहिला नाही; त्यांनी ते नगर पूर्ण सोडून देऊन आणि उघडे टाकून इस्राएलाचा पाठलाग केला.
18 १८ तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “तुझ्या हाती असलेली बरची आय नगराकडे कर, कारण ते मी तुझ्या हाती देईन” त्याप्रमाणे यहोशवाने आपल्या हाती असलेली बरची नगराकडे केली.
19 १९ त्याने आपला हात उगारताच दबा धरणाऱ्या सैन्याने वेगाने धावत जाऊन नगरात प्रवेश केला व ते काबीज केले आणि लगेच नगराला आग लावली.
20 २० आय नगराच्या पुरुषांनी मागे वळून पहिले तो नगरातून निघणारा धूर आकाशात चढताना त्यांना दिसला, तेव्हा त्यांना इकडे किंवा तिकडे निसटून जाण्याचा मार्गच राहिला नाही; इकडे जे लोक रानाच्या मार्गाने पळत होते ते आपला पाठलाग करणाऱ्यांवर उलटले.
21 २१ दबा धरणाऱ्यांनी नगर घेतले आहे व त्याचा धूर वर चढत असल्याचे यहोशवा व सर्व इस्राएलांनी पाहिले तेव्हा ते मागे उलटून आय नगराच्या मनुष्यांवर तुटून पडले.
22 २२ आणि दुसरे इस्राएल सैन्य जे नगरात होते ते त्यांच्यावर चाल करून बाहेर आले. आय नगराची माणसे इस्राएलाच्या मध्ये सापडली; कित्येक इस्राएल इकडे व कित्येक तिकडे होते; आणि त्यांनी त्यांना असे मारले की त्यांच्यातला कोणी वाचला किंवा निसटून गेला नाही.
23 २३ त्यांनी आय नगराच्या राजाला पकडून जिवंत ठेवले आणि त्यास यहोशवाकडे आणले.
24 २४ ज्या मोकळ्या रानात त्यांनी त्यांचा पाठलाग केला होता तेथे इस्राएलांनी आय नगराच्या रहिवाश्यांचा संहार केला आणि त्यांनी त्या सर्वांचा तलवारीच्या धारेने नाश केला. मग इस्राएल लोक आय नगरात परत आले. त्यावर त्यांनी तलवारीच्या धारेने हल्ला केला.
25 २५ त्या दिवशी आय नगरातली सगळी माणसे पडली, त्यामध्ये सर्व स्त्रिया आणि पुरुष मिळून ती बारा हजार होती.
26 २६ आय येथील सर्व रहिवाश्यांचा समूळ नाश होईपर्यंत यहोशवाने नगराकडे बरची उगारलेला आपला हात मागे घेतला नाही.
27 २७ परमेश्वराने यहोशवाला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएलांनी त्या नगरांतली गुरेढोरे व इतर मालमत्ता मात्र स्वतःसाठी लूट म्हणून घेतली.
28 २८ तेव्हा यहोशवाने आय नगर जाळून टाकले व त्याची कायमची नासाडी करून त्याचा ढीग केला; आजपर्यंत ते ठिकाण भकास आहे.
29 २९ आय नगराच्या राजाला त्याने संध्याकाळपर्यंत झाडावर फाशी दिली व सूर्यास्ताच्या वेळी यहोशवाच्या आज्ञेने त्यांनी त्याचे प्रेत झाडावरून काढून नगराच्या वेशीजवळ फेकले आणि त्याच्यावर धोंड्यांची मोठी रास केली. ती आजपर्यंत तशीच आहे.
30 ३० मग यहोशवाने इस्राएलाचा देव परमेश्वर याच्यासाठी एबाल डोंगरावर एक वेदी बांधली;
31 ३१ परमेश्वराचा सेवक मोशे याने इस्राएल लोकांस आज्ञा केल्याप्रमाणे, “अर्थात मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथांत लिहिल्याप्रमाणे त्याने न घडलेल्या दगडांची वेदी बांधली.” त्या दगडांना लोखंडाचा स्पर्शदेखील झाला नव्हता. त्या वेदीवर त्यांनी परमेश्वरास होमबली अर्पिले आणि शांत्यर्पणाचे यज्ञ केले.
32 ३२ तेथे इस्राएल लोकांदेखत यहोशवाने दगडांच्या शिळांवर मोशेने दिलेल्या नियमशास्त्राची नक्कल लिहिली.
33 ३३ परमेश्वराचा कराराचा कोश वाहणाऱ्या लेवी याजकांसमोर सर्व इस्राएल, त्यांचे वडील, अधिकारी आणि न्यायाधीश तसेच देशात जन्मलेले आणि उपरी हे कोशाच्या उजवीकडे व डावीकडे उभे राहिले. इस्राएल लोकांस प्रथम आशीर्वाद देण्यासंबंधी परमेश्वराचा सेवक मोशे याने पूर्वी जी आज्ञा दिली होती, त्याप्रमाणे निम्मे लोक गरीज्जीम डोंगरासमोर व निम्मे एबाल डोंगरासमोर उभे राहिले.
34 ३४ त्यानंतर नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेली आशीर्वादाची व शापाशी सर्व वचने त्याने वाचून दाखवली.
35 ३५ इस्राएलाच्या संबध मंडळीसमोर व त्यांच्या स्त्रिया, मुलेबाळे व त्यांच्यामध्ये राहणारे उपरी यांच्यासमोर मोशेने दिलेल्या सगळ्या आज्ञा यहोशवाने वाचून दाखविल्या; त्यातला एकही शब्द त्याने गाळला नाही.