< योएल 2 >
1 १ सियोनात कर्णा फुंका, आणि माझ्या पवित्र पर्वतावरून मोठ्याने गजर करा! या देशात राहणाऱ्यांचा भीतीने थरकाप उडू द्या, कारण परमेश्वराचा दिवस येत आहे; खरोखर, तो जवळ आहे.
2 २ तो काळोखाचा आणि अंधाराचा प्रकाशाचा, तो ढगाळ व दाट अंधकाराचा दिवस आहे. तो पर्वतावर पसरलेल्या पहाटेसारखा, त्याचे प्रचंड व शक्तीशाली सैन्य जवळ येत आहे. त्यांच्यासारखे सैन्य कधी झाले नाही, आणि त्यानंतरही अनेक पिढ्या, पुन्हा कधीच होणार नाही.
3 ३ त्यांच्यासमोर अग्नी प्रत्येक वस्तू नाश करत आहे, आणि त्याच्यामागे ज्वाला जाळीत चालली आहे, त्यांच्यासमोरची भूमी एदेनाच्या बागेसारखी आहे, पण त्यांच्यामागे निर्जन वाळवंट आहे. खरोखर, त्यांच्या तावडीतून काहीही सुटणार नाही.
4 ४ सैन्याचे स्वरूप घोड्यांप्रमाणे आहे आणि घोडस्वाराप्रमाणे ते धावतात.
5 ५ त्यांच्या उड्या मारण्याचा आवाज, पर्वतावरून जाणाऱ्या रथांसारखा, धसकट जाळणाऱ्या आग्नीसारखा, युध्दासाठी सज्ज झालेल्या बलवानासारखा आहे.
6 ६ त्यांच्यापुढे लोक व्यथित होतात आणि त्यांचे चेहेरे पांढरेफटक पडतात.
7 ७ ते वीरासारखे धावतात, ते सैनिकासारखे तटांवर चढतात, ते प्रत्येक आपल्या मार्गात चालत जातात, आणि आपली रांग तोडीत नाहीत.
8 ८ ते एकमेकांना रेटीत नाहीत. प्रत्येकजण आपल्या वाटेने जातात. ते संरक्षणातून जातात आणि ते रेषेबाहेर जात नाहीत.
9 ९ ते नगरातून धावत फिरतात. ते तटावर धावतात. ते चढून घरात शिरतात. चोराप्रमाणे ते खिडक्यांतून आत जातात.
10 १० त्यांच्यापुढे पृथ्वी कापते, आकाश थरथरते, सूर्य आणि चंद्र काळे पडतात आणि तारे तळपण्याचे थांबतात.
11 ११ परमेश्वर आपल्या सैन्यापुढे आपला आवाज उंचावतो, त्याचे योद्धे खूप असंख्य आहेत, कारण जो कोणी त्याची आज्ञा आमलात आणतो तो बलशाली आहे. कारण परमेश्वराचा दिवस हा मोठा आणि फार भयंकर आहे. त्यामध्ये कोण टिकू शकेल?
12 १२ “तरी आताही” परमेश्वर म्हणतो, “तुम्ही आपल्या सर्व मनापासून माझ्याकडे परत या. रडा, शोक करा आणि उपवास करा.”
13 १३ आणि तुम्ही आपले कपडेच फाडू नका, तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याकडे वळा, कारण तो कृपाळू व दयाळू आहे, तो रागावण्यास मंद आणि विपुल प्रेम करणारा आहे, आणि त्याने लादलेल्या शिक्षेपासून तो मागे फिरेल.
14 १४ परमेश्वर तुमचा देव याला कळवळा येऊन आणि कदाचित तो मागे वळेल, आणि त्याच्यामागे आपल्यासाठी आशीर्वादही ठेवून जाईल की, काय कोण जाणे? त्यास अन्नार्पण व पेयार्पण ही देता येतील?
15 १५ सियोनात कर्णा फुंका. एक पवित्र उपास नेमा, आणि पवित्र मंडळीला बोलवा.
16 १६ लोकांस एकत्र जमवा, मंडळीला पवित्र करा. वडिलांना एकत्र करा, मुलांना आणि अंगावर दूध पिणाऱ्या अर्भकाना एकत्र जमवा. वर आपल्या खोलीतून आणि वधूही आपल्या मंडपातून बाहेर येवो.
17 १७ याजकांना, परमेश्वराच्या सेवकांना, द्वारमंडप व वेदी यांच्यामध्ये रडू द्या. त्यांनी म्हणावे, परमेश्वरा, आपल्या लोकांवर दया कर. आणि आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस. म्हणून राष्ट्रांनी त्यांच्यावर अधिकार करावा. राष्ट्रांनी आपसात असे कां म्हणावे त्यांचा देव कोठे आहे?
18 १८ मग, तेव्हा परमेश्वराने देशासाठी, ईर्ष्या धरली, आणि त्याने आपल्या लोकांवर दया केली.
19 १९ परमेश्वराने आपल्या लोकांस उत्तर देऊन म्हटले, “पाहा, मी तुमच्याकडे धान्य, नवा द्राक्षरस आणि तेल पाठवीन. तुम्ही त्यांनी तृप्त व्हाल, आणि ह्यापुढे, राष्ट्रात तुमची निंदा मी होऊ देणार नाही.
20 २० मी उत्तरेकडून हल्ला करणाऱ्यांना तुम्हापासून दूर करीन, आणि मी त्यांना रूक्ष आणि ओसाड देशात घालवून देईन. त्यांची आघाडी पूर्व समुद्रात आणि त्यांची पिछाडी पश्चिम समुद्रात जाईल. त्यांचा दुर्गध चढेल. आणि तेथे वाईट दुर्गंधी पसरेल. मी महान गोष्टी करीन.”
21 २१ हे भूमी, घाबरू नकोस. आनंद कर आणि उल्हसित हो, कारण परमेश्वराने महान गोष्टी केल्या आहेत.
22 २२ रानातल्या प्राण्यांनो, घाबरू नका. कारण रानातील कुरणांत हिरवळ उगवेल, झाडे त्यांचे फळे देतील, आणि अंजिराची झाडे व द्राक्षवेली आपले पूर्ण पीक देतील.
23 २३ म्हणून सियोनवासीयांनो, आनंदीत व्हा. आणि परमेश्वर तुमच्या देवामध्ये उल्हासित व्हा. कारण तुम्हास हितकर होईल इतका आगोटीचा पाऊस तो देतो, तो पहिली पर्जन्यवृष्टी योग्य प्रमाणाने देतो, आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडतो.
24 २४ खळी गव्हाने भरून जातील, आणि पिंपे द्राक्षरसाने व जैतूनाच्या तेलाने भरून वाहतील.
25 २५ मी, माझे सैन्य तुमच्याविरुध्द पाठवले. तुमचे जे काही होते ते, नाकतोडे, टोळ, कुसरूड व घुले यांनी खाल्ले. मी, तुमच्या संकटाच्या वर्षाची भरपाई करीन.
26 २६ मग तुम्हास भरपूर खायला मिळेल. तुम्ही तृप्त व्हाल. आणि तुम्ही, तुमच्या परमेश्वर देवाची, स्तुती कराल. त्याने तुमच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत. माझ्या लोकांस पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही.
27 २७ मी इस्राएलाच्या बाजूने आहे हे तुम्हास समजेल. आणि मी परमेश्वर म्हणजे तुमचा देव आहे, आणि दुसरा कोणीच नाही. माझ्या लोकांस पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही.
28 २८ ह्यानंतर मी माझा आत्मा सर्व देहावर ओतीन, आणि तुमची मुले आणि तुमच्या मुली भविष्य सांगतील. तुमच्यातील वृद्धांना स्वप्न पडतील. तुमच्यातील तरूणांना दृष्टांत होतील.
29 २९ आणि त्या दिवसात मी माझा आत्मा दासांवर व स्त्री दासीवरसुद्धा ओतीन.
30 ३० मी आकाशात आणि पृथ्वीवर आश्चर्यकारक चिन्हे आणि तेथे रक्त, अग्नी व दाट धुराचे खांब दाखवीन.
31 ३१ परमेश्वराचा महान आणि भयंकर दिवस उगवण्यापूर्वी सूर्य बदलून अंधकारमय आणि चंद्र रक्तमय असा होईल.
32 ३२ जसे परमेश्वराने म्हटले, जो कोणी परमेश्वराच्या नावाने हाक मारील तो प्रत्येकजण वाचेल. जे कोणी बचावतील ते सियोन पर्वतावर व यरूशलेमेत राहतील, आणि ज्यांना परमेश्वर बोलावतो, ते बाकी वाचलेल्यात राहतील.