< यिर्मया 13 >
1 १ परमेश्वर मला असे म्हणाला: “जा आणि तागाचा कमरबंद विकत घे आणि तो आपल्या कमरेस बांध, पण पहिल्याने तो पाण्यात घालू नको.”
2 २ तेव्हा मी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे नेसावयास विकत घेतले व ते माझ्या कमरेस बांधले.
3 ३ नंतर परमेश्वराकडून मला दुसऱ्यांदा वचन प्राप्त झाले ते असे,
4 ४ “तू नेसावयास विकत घेतलेले, जे तुझ्या कमरेस बांधले आहे, उठ आणि फरात नदी कडे जा आणि तिथे ते खडकाला पडलेल्या खाचेत लपवून ठेव.”
5 ५ त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि अगदी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे ते लपवून ठेवले.
6 ६ पुष्कळ दिवसानी, परमेश्वर मला म्हणाला, “उठ आणि फरातला जा व लपवून ठेवायला सांगितलेला कमरबंध परत घे.”
7 ७ त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि जो कमरबंध मी लपवला होता तो उकरुन काढला. पण पाहा! आता तो कमरबंद नष्ट झाला होता, तो अगदी निरुपयोगी झाला.
8 ८ तेव्हा परमेश्वराचे वचन मजकडे पुन्हा आले व म्हणाले.
9 ९ परमेश्वर असे म्हणतो, “याचप्रकारे मी यहूदाचा आणि यरूशलेमेचा अहंकारी नष्ट करीन.
10 १० हे दुष्ट लोक जे माझे वचन ऐकण्यास नकार देतात, जे त्यांच्या हृदयाच्या कठोरपणात चालतात, जे दुसऱ्या देवाच्या मागे त्याची उपासना करण्यास आणि त्यांच्या समोर नमन करण्यास जातात, ते या कमरबंधाप्रमाणे होतील, ज्याचा काहीच उपयोग नाही.
11 ११ कारण जसा कमरबंध मनुष्याच्या कमरेभोवती लपेटलेला असतो, त्याप्रमाणे मी यहूदाची आणि इस्राएलची कुटुंबे, ते लोक माझे व्हावे, मला कीर्ती, प्रशंसा आणि मान मिळवून द्यावा म्हणून मी त्यांना आपणास लपेटलेले आहे. पण ते माझे ऐकावयाचे नाही.” परमेश्वर असे म्हणतो.
12 १२ “यास्तव तू हे वचन त्याना बोललेच पाहिजे, परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो, ‘प्रत्येक बुधला द्राक्षरसाने भरेल.’ तेव्हा ते तुला म्हणतील प्रत्येक बुधला द्राक्षरसाने भरेल हे आम्हांला माहीत नाही काय?
13 १३ मग तू त्यांना सांग, ‘परमेश्वर असे म्हणतो, पाहा! या देशात राहणारे, दावीदाच्या सिंहासनावर बसलेले राजे, याजक, संदेष्टे आणि यरूशलेममध्ये सर्व राहणारे यांना मी मद्याच्या धुंदीने भरीन.
14 १४ मग मी त्यांना एकमेकांवर आदळीन, पिता पुत्र एकमेकांवर आदळतील, मी त्यांचा नाश करू नये असा त्यांचा कळवळा मी करणार नाही, किंवा त्यांना सोडणार नाही, किंवा त्यांच्यावर दया करणार नाही. असे परमेश्वर म्हणतो.
15 १५ ऐका आणि लक्ष द्या, गर्विष्ठ बनू नका, कारण परमेश्वर तुमच्याशी बोलला आहे.
16 १६ त्याने अंधकार पसरविण्याच्या आधी, आणि अंधकारमय पर्वतावर तो तुमचे पाय डळमळण्याचे कारण बनण्याआधी, आणि तुम्ही प्रकाशाची प्रतीक्षा करतांना तो त्याची मृत्यूछाया करील व त्याचा निबीड अंधार करून ठेवील त्याच्या आधी, परमेश्वर, तुमचा देव याला मान द्या.
17 १७ म्हणून जर तुम्ही ऐकणार नसाल, तर मी तुमच्या अहंकारामुळे शोकाकुल होईन. माझे डोळे खात्रीने अश्रू गाळतील आणि आसवे वाहवील. कारण परमेश्वराचा कळप बंदिस्त केला आहे.
18 १८ राजाला आणि राणीच्या आईला सांग, स्वत: ला नम्र करा आणि खाली बसा, कारण तुमचा मुकुट, म्हणजे तुमचे गौरव आणि गर्व, खाली पडले आहे.
19 १९ नेगेबमधील शहरे बंद केली गेली आहेत, ती उघडायला कोणी नाही. यहूदाला बंदिस्त केले आहे, तिच्यातील सर्व हद्दपार करण्यात आले आहेत.
20 २० आपले डोळे वर लाव आणि जो उत्तरेहून येत आहे त्यास पाहा. त्याने दिलेला कळप, तुला अति सुंदर असलेला कळप कोठे आहे?
21 २१ ज्यांना तू आपले मित्र होण्यास शिकवले, त्यांच्यावर देव जेव्हा तुला ठेवणार, तेव्हा तू काय करशील? जसे प्रसुतपावणाऱ्या स्त्रीला वेदना वेढतात, त्याचप्रमाणे हा तुझ्या वेदनांचा प्रारंभ नाही काय?
22 २२ तेव्हा तू कदाचित् स्वत: च्या मनास विचारशील, “माझ्या सोबतच या गोष्टी का घडतात?” हे असे आहे कारण तुझ्या अनेक पापांमुळे तुझा घागरा उठला गेला आहे आणि तुझा बलात्कार झाला आहे.
23 २३ कुशी लोक त्यांच्या कातडीचा रंग बदलू शकतील काय? किंवा चित्ता त्याच्यावरील ठिपके बदलू शकेल काय? त्याचप्रमाणे तुम्हास, जी नेहमीच वाईट करण्याची सवय आहे, ते तुम्ही चांगले करणार काय.
24 २४ यास्तव वाळवंटातील उडून जाणाऱ्या भुसकटाप्रमाणे मी त्यांचा नाश करील.
25 २५ हेच तुला माझ्याकडून देण्यात आले आहे, तुझा घोषीत केलेला वाटा, कारण तू मला विसरली आहे आणि खोट्यावर विश्वास ठेवला आहे, असे परमेश्वर म्हणतो.
26 २६ यरूशलेम, मी तुझा घागरा डोक्याकडून खेचीन. प्रत्येकजण तुला पाहील आणि तुझी बेअब्रू होईल.
27 २७ तुझी जारकर्मे आणि खिदळणे, तुझ्या व्यभिचाराची दुष्टाई ही रानांतल्या डोंगरावर मी पाहिली आहेत, हे यरूशलेमे, तुला हाय! तू स्वच्छ केली जात नाही आहे, असे किती काळ चालणार?