< यशया 16 >
1 १ जो सेलापासून रानापर्यंत देशावर राज्य करतो त्यास तुम्ही सीयोनकन्येच्या पर्वतावर कोकरे पाठवा.
2 २ कारण विखरलेल्या घरट्याप्रमाणे, भटकणाऱ्या पक्ष्याप्रमाणे, मवाबाच्या स्त्रिया आर्णोन नदीच्या उताराजवळ भटकतील.
3 ३ सूचना दे, न्याय अंमलात आण; दुपारी तू आपली सावली रात्रीसारखी कर; शरणार्थीस लपीव; शरणार्थींचा विश्वासघात करू नकोस.
4 ४ मवाबामधील निर्वासितास, तुझ्यात राहू दे; तू त्यांना नाश करणाऱ्यापासून लपण्याचे ठिकाण हो. कारण जुलूम करणारा थांबेल आणि नासधूस बंद होईल. ज्यांनी तुडवले ते देशातून नाहीसे होतील.
5 ५ विश्वासाच्या कराराने सिंहासन स्थापित होईल; आणि दावीदाच्या तंबूतून कोणीएक निष्ठावान तेथे बसेल. तो धार्मिकतेने न्याय शोधील आणि त्याप्रमाणे न्याय देईल.
6 ६ आम्ही मवाबाच्या गर्वाविषयी, त्यांच्या उद्धटपणाविषयी, त्याची फुशारकी व संतापाविषयी ऐकले आहे. पण त्यांची फुशारकी निरर्थक आहेत.
7 ७ यामुळे मवाब मवाबाकरता आकांत करील, प्रत्येकजण आकांत करील. कीर-हेरेसेथाच्या मनुकांच्या ढेपांसाठी जे पूर्णपणे उध्वस्त झाले आहे तुम्ही त्यासाठी शोक कराल.
8 ८ हेशबोनाची शेते व त्याचप्रमाणे सिब्मेच्या द्राक्षवेली सुकून गेल्या आहेत. राष्ट्रांच्या अधिपतींनी निवडलेल्या द्राक्षवेली पायदळी तुडवल्या आहेत त्या याजेरास पोहचल्या आणि रानामध्ये पसरून गेल्या होत्या. त्यांचा कोंब चोहोकडे पसरून समुद्राच्या पार गेला होता.
9 ९ यामुळे मी खरोखर याजेराबरोबर सिब्मेच्या द्राक्षवेलीकरता रडेल. मी आपल्या अश्रूंनी हेशबोन व एलाले तुम्हास पाणी घालीन. कारण तुझ्या शेतातील उन्हाळी फळांनी आणि तुझ्या कापणीच्या आनंदाच्या आरोळीचा मी शेवट केला आहे.
10 १० उपवनातील फळ झाडांपासून आनंद व उल्लास नाहीसा झाला आहे; आणि तुमच्या द्राक्षमळ्यात तेथे गायनाचा व आनंदाचा गजर होत नाही. व्यापारी दाबून मद्य काढण्याचे व्यवसाय करणार नाही; द्राक्षांच्या हंगामातील आनंदाचा गजर मी बंद केला आहे.
11 ११ यामुळे मवाबाकरता माझे अंतःकरण आणि कीर हेरेसासाठी माझे अंतर्याम तंतुवाद्यासारखे उसासे टाकतात.
12 १२ जेव्हा मवाब स्वतः उंचस्थानावर जाताना थकेल आणि प्रार्थना करायला त्याच्या मंदिरात प्रवेश करील, तरी त्याची प्रार्थना काहीच सिद्धीस नेणार नाही.
13 १३ पूर्वीच्या काळी मवाबाविषयी जे वचन परमेश्वर बोलला आहे ते हेच आहे.
14 १४ पुन्हा परमेश्वर बोलला, “तीन वर्षांच्या आतच, मवाबाचे गौरव नाहीसे होईल; त्यांचे लोक पुष्कळ असूनही, अवशेष फार थोडे आणि क्षुल्लक राहील.