< होशेय 2 >
1 १ “आपल्या भावांना म्हणा, अम्मी, आपल्या बहिणींना म्हणा, रुहाम ‘तुमच्यावर दया करण्यात आली आहे.’”
2 २ तुमच्या आईविरुध्द वाद घाला, वादच घाला, कारण ती माझी पत्नी नाही, आणि मी तीचा पती नाही. ती आपल्या वेश्यावृत्तीचे काम स्वत: पासून सोडून देवो आणि व्याभिचाराचे कामे तिच्या उरांपासून दूर होवो.
3 ३ जर नाही, तर मी तिला नग्न करून जन्माच्या वेळी होती तशी नग्न करीन, मी तिला ओसाड, रुक्ष भूमी सारखे करीन आणि मी तिला तहानेने मारीन.
4 ४ तिची मुले वेश्यावृत्तीमुळे असल्याने मी कसलीच दया त्यांच्यावर करणार नाही.
5 ५ त्यांची आई वेश्या राहिलेली आहे, व तिचे गरोदर राहणे लज्जास्पद प्रकार आहे, ती म्हणाली, मी माझ्या प्रियकरांकडे जाईन, कारण ते मला माझी भाकर आणि पाणी, माझी लोकर आणि ताग, माझे तेल आणि मद्य देतात.
6 ६ म्हणून मी तिच्या मार्गात काटेरी कुंपण घालीन, मी तिच्या विरुध्द भिंत बांधीन म्हणजे तिला वाट सापडणार नाही.
7 ७ ती तिच्या प्रियकरांच्या मागे धावेल पण ती त्यांना गाठू शकणार नाही, ती त्यांचा शोध करेल पण ते तिला सापडणार नाही. मग ती म्हणेल, मी माझ्या पहिल्या नवऱ्याकडे परत जाईल, कारण माझी दशा आतापेक्षा तेव्हा चांगली होती.
8 ८ कारण तिला हे ठाऊक नाही की, तो मी होतो ज्याने तिला धान्य, द्राक्षरस, तेल पुरवली व सोने आणि चांदी सढळपणे दिली, नंतर जी तिने बआल मुर्तीस दिली.
9 ९ म्हणून मी हंगामाच्या वेळी तिचे धान्य आणि ऋतुच्या वेळी तिचा द्राक्षरस परत घेईन. तिची लाज झाकण्यासाठी दिलेली माझी लोकर व ताग सुध्दा परत घेईन.
10 १० नंतर मी तिच्या प्रियकरांसमोर तिला नग्न करीन व त्यापैकी कोणीही तिला माझ्या हातून सोडवू शकणार नाही.
11 ११ मी तीचा आनंद नष्ट करीन तसेच तिचे उत्सव, सण, चंद्रदर्शन, शब्बाथ आणि नेमलेले सर्व सण मी बंद करीन.
12 १२ मी तिच्या द्राक्षवेली आणि अंजिराची झाडे नष्ट करीन, ज्या विषयी ती म्हणाली होती, माझ्या प्रियकरांनी दिलेली ही माझी वेतने आहेत. मी त्याचे रान करीन आणि वन्य पशू येऊन ते फस्त करतील.
13 १३ तिने बआलास धूप दिला, आणि नथ व दागिने घालून स्वत: नटली. मला विसरून आपल्या प्रियकरांमागे गेली म्हणून मी तिला शिक्षा करीन असे परमेश्वर म्हणतो.
14 १४ यास्तव, मी तिला परत मिळविन मी तिला जंगलात घेऊन जाईन, आणि प्रेमाने तिच्याशी बोलेन.
15 १५ मी तिला तिचे द्राक्षमळे परत करेन, आशेचे दार म्हणून अखोरचे खोरे देईन. तेव्हा ती मला उत्तर देईल, जसे तिने आपल्या तरुणपणी दिले होते, जेव्हा ती मिसर देशातून आली होती.
16 १६ हे परमेश्वर घोषित करतो की, त्या दिवसात असे होईल की तू मला माझा पती म्हणशील, आणि पुन्हा मला बाली म्हणणार नाहीस.
17 १७ कारण मी तिच्या मुखातून बआलाची नावे काढून टाकेन, व तिला त्यांची नावे त्यानंतर आठवली जाणार नाही.
18 १८ त्या दिवशी मी इस्राएलासाठी वनपशु, आकाशातील पाखरे, भूमीवर रांगणारे ह्यांसोबत करार करीन. मी देशातून धनुष्य तलवार आणि लढाई नाहीशी करीन, व ते तेथे सुरक्षित वस्ती करतील.
19 १९ मी तुझा कायमचा वाग्दत्त पती होईन. मी धर्म, न्याय, करार, विश्वासूपण आणि दया ह्यात तुझा वाग्दत्त पती होईन.
20 २० मी तुला विश्वासूपणे वाग्दत्त करीन, व तू हे जाणशील की, मी परमेश्वर आहे.
21 २१ आणि त्या दिवशी, मी उत्तर देईन, असे परमेश्वर घोषीत करतो, मी आकाशाला उत्तर देईल आणि आकाश भूमीला उत्तर देईन.
22 २२ आणि भूमी धान्य, नवा द्राक्षरस आणि तेल देईल आणि ते इज्रेलास उत्तर देतील.
23 २३ मी स्वत: साठी तिचे रोपण भूमीत करीन, आणि लो रुहामावर दया करीन. जे माझे लोक नव्हते त्यास मी माझे लोक म्हणेन आणि ते मला तू माझा देव आहेस असे म्हणतील.