< उत्पत्ति 35 >
1 १ देव याकोबाला म्हणाला, “ऊठ, बेथेल नगरामध्ये जा आणि तेथे राहा. तुझा भाऊ एसाव याजपासून तू पळून जात असताना ज्याने तुला दर्शन दिले, त्या देवासाठी तेथे एक वेदी बांध.”
2 २ तेव्हा याकोब आपल्या घरातील सर्व मंडळीला व आपल्याबरोबरच्या सगळ्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ असलेल्या परक्या देवांचा त्याग करा. तुम्ही स्वतःला शुद्ध करा. आपले कपडे बदला.
3 ३ नंतर आपण येथून निघून बेथेलास जाऊ. मी दुःखात असताना ज्याने मला उत्तर दिले आणि जेथे कोठे मी गेलो तेथे जो माझ्याबरोबर होता, त्या देवासाठी मी वेदी बांधीन.”
4 ४ तेव्हा त्या लोकांनी त्यांच्या हातातले सर्व परके देव आणि आपल्या कानातील कुंडलेही आणून याकोबाला दिली. तेव्हा याकोबाने त्या सर्व वस्तू शखेम नगराजवळील एला झाडाच्या खाली पुरून टाकल्या.
5 ५ ते तेथून निघाले, त्यांच्या सभोवतालच्या नगरावर देवाने भीती उत्पन्न केली, म्हणून त्यांनी याकोबाच्या मुलांचा पाठलाग केला नाही.
6 ६ अशा रीतीने याकोब व त्याच्याबरोबरचे सर्व लोक कनान देशात लूज येथे येऊन पोहचले त्यालाच आता बेथेल म्हणतात.
7 ७ त्याने तेथे एक वेदी बांधली, व त्या ठिकाणाचे नाव “एल-बेथेल” असे ठेवले. कारण आपला भाऊ एसाव याजपासून पळून जाताना याच जागी प्रथम देवाने त्यास दर्शन दिले होते.
8 ८ रिबकेची दाई दबोरा या ठिकाणी मरण पावली तेव्हा त्यांनी तिला बेथेल येथे अल्लोन झाडाच्या खाली पुरले; त्या जागेचे नाव त्यांनी अल्लोन बाकूथ म्हणजे रडण्याचे अल्लोन असे ठेवले.
9 ९ याकोब पदन-अराम येथून परत आला, तेव्हा देवाने त्यास पुन्हा दर्शन दिले आणि त्यास आशीर्वाद दिला.
10 १० देव त्यास म्हणाला, “तुझे नाव याकोब आहे, परंतु तुला आता याकोब म्हणणार नाहीत तर तुझे नवे नाव इस्राएल असे होईल.” म्हणून देवाने त्यास इस्राएल हे नाव दिले.
11 ११ देव त्यास म्हणाला, “मी सर्व सर्वसमर्थ देव आहे. तू फलद्रूप आणि बहुगुणित हो. तुझ्यातून एक राष्ट्र आणि राष्ट्रांचा समुदाय येईल व तुझ्या वंशजातून राजे जन्मास येतील.
12 १२ मी अब्राहाम व इसहाक यांना जो देश दिला, तो आता मी तुला व तुझ्यामागे राहणाऱ्या तुझ्या संततीला देतो.”
13 १३ मग देव ज्या ठिकाणी त्याच्याशी बोलला तेथूनच वर निघून गेला.
14 १४ मग याकोबाने तेथे स्मारक म्हणून दगडाचा एक स्तंभ उभा केला त्याने त्यावर पेयार्पण व तेल ओतले.
15 १५ जेथे देवाने याकोबाशी भाषण केले होते त्या स्थानाचे नाव याकोबाने बेथेल ठेवले.
16 १६ मग ते बेथेल येथून पुढे निघाले, ते एफ्राथ गावापासून काही अंतरावर आले असताना तेथे राहेलीस प्रसूतीवेदना सुरू झाल्या. तिला प्रसुतीच्या असह्य वेदना होत होत्या.
17 १७ राहेलीस प्रसूतीवेदनांचा अतिशय त्रास होत असताना, राहेलीची सुईण तिला म्हणाली, “भिऊ नकोस कारण तुला हाही मुलगाच होईल.”
18 १८ त्या मुलाला जन्म देताना राहेल मरण पावली, परंतु मरण्यापूर्वी तिने त्याचे नाव बेनओनी असे ठेवले, परंतु त्याच्या वडिलाने त्याचे नाव बन्यामीन असे ठेवले.
19 १९ राहेल मरण पावली. एफ्राथ (म्हणजे बेथलहेम) गावास जाणाऱ्या वाटेजवळ राहेलीस पुरले.
20 २० आणि याकोबाने तिचे स्मारक म्हणून तिच्या कबरेवर एक स्तंभ उभा केला. तो स्तंभ आजपर्यंत तेथे कायम आहे.
21 २१ त्यानंतर इस्राएल पुढे गेला आणि मिगदाल-एदेरच्या पलीकडे त्याने तळ दिला.
22 २२ इस्राएल त्या देशात राहत होता, त्या वेळी रऊबेन, आपल्या पित्याची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी निजला, हे इस्राएलाने ऐकले. याकोबाला बारा पुत्र होते.
23 २३ त्यास लेआपासून झालेले पुत्र: याकोबाचा ज्येष्ठ मुलगा रऊबेन आणि शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार व जबुलून.
24 २४ त्यास राहेलीपासून झालेले पुत्र: योसेफ व बन्यामीन.
25 २५ त्यास राहेलीची दासी बिल्हापासून झालेले पुत्र: दान व नफताली.
26 २६ आणि लेआची दासी जिल्पा हिचे पुत्र गाद व आशेर. हे सर्व याकोबाचे पुत्र जे त्यास पदन-अरामात झाले.
27 २७ याकोब मग किर्याथ-आर्बा (म्हणजे हेब्रोन) येथीन मम्रे या ठिकाणी आपला बाप इसहाक याजकडे आला. येथेच अब्राहाम व इसहाक हे राहिले होते.
28 २८ इसहाक एकशे ऐंशी वर्षे जगला.
29 २९ इसहाकाने शेवटचा श्वास घेतला आणि मरण पावला, आणि आपल्या पूर्वजास मिळाला, तो म्हातारा व आयुष्याचे पूर्ण दिवस होऊन मरण पावला. त्याचे पुत्र एसाव व याकोब यांनी त्यास पुरले.