< उत्पत्ति 24 >
1 १ आता अब्राहाम बऱ्याच वयाचा म्हातारा झाला होता आणि परमेश्वराने अब्राहामाला सर्व गोष्टींत आशीर्वादित केले होते.
2 २ अब्राहामाने त्याच्या सर्व मालमत्तेचा व घरादाराचा कारभार पाहणाऱ्या आणि त्याच्या घरातील सर्वांत जुन्या सेवकाला म्हटले, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव,
3 ३ आणि आकाशाचा देव व पृथ्वीचा देव जो परमेश्वर, याची शपथ मी तुला घ्यायला लावतो की, ज्या कनानी लोकांमध्ये मी राहत आहे, त्यांच्या मुलींतून तू माझ्या मुलांसाठी पत्नी पाहणार नाहीस.
4 ४ परंतु, तू माझ्या देशाला माझ्या नातेवाइकांकडे जाशील, आणि तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी पत्नी मिळवून आणशील.”
5 ५ सेवक त्यास म्हणाला, “ती स्त्री जर माझ्याबरोबर या देशात येण्यास तयार झाली नाही तर? ज्या देशातून तुम्ही आला त्या देशात मी मुलाला घेऊन जावे काय?”
6 ६ अब्राहाम त्यास म्हणाला, “तू माझ्या मुलाला तिकडे परत घेऊन न जाण्याची खबरदारी घे!
7 ७ आकाशाचा देव परमेश्वर, ज्याने मला माझ्या वडिलाच्या घरातून व माझ्या नातेवाइकांच्या देशातून मला आणले व ज्याने बोलून, ‘मी हा देश तुझ्या संततीला देईन,’ असे शपथपूर्वक अभिवचन दिले, तो परमेश्वर आपल्या दूताला तुझ्या पुढे पाठवील, आणि तू तेथून माझ्या मुलासाठी पत्नी आणशील.
8 ८ परंतु ती स्त्री तुझ्याबरोबर येथे येण्यास कबूल झाली नाही, तर मग तू माझ्या शपथेतून मोकळा होशील. परंतु माझ्या मुलाला तू तिकडे घेऊन जाऊ नकोस.”
9 ९ तेव्हा त्या सेवकाने आपला धनी अब्राहाम याच्या मांडीखाली हात ठेवला आणि त्या बाबीसंबंधाने त्याच्याशी शपथ घेतली.
10 १० मग त्या सेवकाने धन्याच्या उंटांपैकी दहा उंट घेतले आणि निघाला (त्याच्या धन्याची सर्व मालमत्ता त्याच्या हाती होती). त्याने आपल्या धन्याकडून सर्व प्रकारच्या भेटवस्तू आपल्याबरोबर देण्यासाठी घेतल्या. तो अराम-नहराईम प्रदेशातील नाहोराच्या नगरात गेला.
11 ११ त्याने नगराबाहेरच्या विहिरीजवळ आपले उंट खाली बसवले. ती संध्याकाळ होती, त्या वेळी पाणी काढायला स्त्रिया तेथे येत असत.
12 १२ नंतर तो म्हणाला, “हे परमेश्वरा, तू माझा धनी अब्राहाम याचा देव आहेस, आज मला यश मिळण्यास मदत कर आणि तू प्रामाणिकपणाने करार पाळणारा आहेस हे माझा धनी अब्राहाम ह्याला दाखवून दे.
13 १३ पाहा, मी पाण्याच्या झऱ्याजवळ उभा आहे. आणि नगरातील लोकांच्या मुली पाणी काढण्यास बाहेर येत आहेत.
14 १४ तर असे घडू दे की, मी ज्या मुलीस म्हणेन, ‘मुली तुझी पाण्याची घागर उतरून मला प्यायला पाणी दे,’ आणि ती जर ‘तुम्ही प्या, आणि मी तुमच्या उंटांनाही पाणी पाजते,’ तर मग तीच तुझा सेवक इसहाक ह्याच्यासाठी तू नेमलेली असू दे. त्यावरून मी असे समजेन की, तू माझ्या धन्यासोबत करार पाळण्याचा प्रामाणिकपणा दाखवला आहे.”
15 १५ मग असे झाले की, त्याचे बोलणे संपले नाही तोच, पाहा, रिबका तिची मातीची घागर तिच्या खांद्यावर घेऊन बाहेर आली. रिबका ही अब्राहामाचा भाऊ नाहोर याच्यापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची कन्या होती.
16 १६ ती तरुण स्त्री फार सुंदर आणि कुमारी होती. तिचा कोणाही पुरुषाबरोबर संबंध आलेला नव्हता. ती विहिरीत खाली उतरून गेली आणि तिची घागर भरून घेऊन वर आली.
17 १७ तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला म्हणाला, “कृपा करून तुझ्या घागरीतून मला थोडे पाणी पाज.”
18 १८ ती म्हणाली, “प्या माझ्या प्रभू,” आणि तिने लगेच आपली घागर आपल्या हातावर उतरून घेऊन घेतली, आणि त्यास पाणी पाजले.
19 १९ त्यास पुरे इतके पाणी पाजल्यानंतर ती म्हणाली, “मी तुमच्या उंटांसाठीसुद्धा, त्यांना पुरेल इतके पाणी पिण्यास काढते.”
20 २० म्हणून तिने घाईघाईने उंटांसाठी घागर कुंडात ओतली, आणि आणखी पाणी काढण्याकरिता ती धावत विहिरीकडे गेली, आणि याप्रमाणे तिने त्याच्या सगळ्या उंटांना पाणी पाजले.
21 २१ तेव्हा, परमेश्वर देवाने आपला प्रवास यशस्वी केला की नाही, हे समजावे म्हणून तो मनुष्य तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला.
22 २२ उंटांचे पाणी पिणे संपल्यावर त्या मनुष्याने अर्धा शेकेल वजनाची सोन्याची नथ आणि तिच्या हातासाठी दहा शेकेल वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या काढल्या,
23 २३ आणि विचारले, “तू कोणाची मुलगी आहेस? तसेच तुझ्या वडिलाच्या घरी आम्हा सर्वांना रात्री मुक्काम करावयास जागा आहे का ते कृपा करून सांग.”
24 २४ ती त्यास म्हणाली, “मी बथुवेलाची, म्हणजे नाहोरापासून मिल्केला जो मुलगा झाला त्याची मुलगी आहे.”
25 २५ ती आणखी त्यास म्हणाली, “आमच्याकडे तुमच्या उंटांसाठी भरपूर गवत व पेंढा आहे आणि तुमच्या सर्वांसाठी मुक्काम करण्यासाठी आमच्याकडे भरपूर जागा आहे.”
26 २६ तेव्हा त्या मनुष्याने लवून परमेश्वराची उपासना केली.
27 २७ तो म्हणाला, “माझा धनी, अब्राहाम ह्याचा देव परमेश्वर धन्यवादित असो, त्याने माझ्या धन्यासंबंधीचा कराराचा प्रामाणिकपणा आणि विश्वसनीयता सोडली नाही, माझ्याबाबत सांगायचे तर, परमेश्वराने मला माझ्या धन्याच्या नातेवाइकाकडेच सरळ मार्ग दाखवून आणले.”
28 २८ नंतर ती तरुण स्त्री पळत गेली आणि तिने या सर्व गोष्टींबद्दल आपल्या आईला व घरच्या सर्वांना सांगितले.
29 २९ रिबकेला एक भाऊ होता, आणि त्याचे नाव लाबान होते. लाबान बाहेर विहिरीजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या त्या मनुष्याकडे पळत गेला.
30 ३० जेव्हा त्याने आपल्या बहिणीच्या नाकातील नथ व हातातील सोन्याच्या बांगड्या पाहिल्या, आणि “तो मनुष्य मला असे म्हणाला,” असे आपल्या बहिणीचे, म्हणजे रिबकेचे शब्द ऐकले, तेव्हा तो त्या मनुष्याकडे आला, आणि पाहतो तो, तो उंटांपाशी विहिरीजवळ उभा होता.
31 ३१ आणि लाबान त्यास म्हणाला, “परमेश्वराचा आशीर्वाद लाभलेले तुम्ही, आत या. तुम्ही बाहेर का उभे आहात? मी तुमच्यासाठी घर तयार केले आहे आणि उंटासाठीही जागा केली आहे.”
32 ३२ तो मनुष्य घरी आला आणि त्याने उंट सोडले. उंटांना गवत व पेंढा दिला आणि त्याचे पाय व त्याच्या बरोबरच्या लोकांचे पाय धुण्यासाठी पाणी देण्यात आले.
33 ३३ त्यांनी त्याच्या पुढे जेवण वाढले, परंतु तो म्हणाला, “मला जे काही सांगायचे ते सांगेपर्यंत मी जेवणार नाही.” तेव्हा लाबान म्हणाला, “सांगा.”
34 ३४ तो म्हणाला, “मी अब्राहामाचा सेवक आहे.
35 ३५ परमेश्वर देवाने माझ्या धन्याला फार आशीर्वादित केले आहे आणि तो महान बनला आहे. त्याने त्यास मेंढरांचे कळप, गुरेढोरे, तसेच सोने, चांदी, दासदासी, उंट व गाढवे दिली आहेत.
36 ३६ सारा, ही माझ्या धन्याची पत्नी वृद्ध झाली तेव्हा तिच्यापासून माझ्या धन्याला मुलगा झाला, आणि त्यास त्याने आपले सर्वकाही दिले आहे.
37 ३७ माझ्या धन्याने माझ्याकडून वचन घेतले, तो म्हणाला, ‘ज्यांच्या राज्यात मी माझे घर केले आहे त्या कनानी लोकांतून माझ्या मुलासाठी कोणी मुलगी पत्नी करून घेऊ नकोस.
38 ३८ त्याऐवजी माझ्या वडिलाच्या परिवाराकडे जा, आणि माझ्या नातलगांकडे जा व तेथून माझ्या मुलासाठी तू पत्नी मिळवून आण.’
39 ३९ मी माझ्या धन्याला म्हणालो, ‘यदाकदाचित मुलगी माझ्याबरोबर येणार नाही?’
40 ४० परंतु तो मला म्हणाला, ‘ज्या परमेश्वरासमोर मी चालत आहे, तो त्याच्या दूताला तुझ्याबरोबर पाठवील व तो तुझा मार्ग यशस्वी करील, आणि तू माझ्या नातलगांतून व माझ्या वडिलाच्या घराण्यातून माझ्या मुलासाठी पत्नी आणशील.
41 ४१ परंतु जेव्हा तू माझ्या नातलगांमध्ये जाशील आणि जर त्यांनी तुला ती दिली नाही, तर मग तू माझ्या शपथेतून मोकळा होशील.’
42 ४२ आणि आज मी या झऱ्याजवळ आलो आणि म्हणालो, ‘हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहाम याच्या देवा, कृपा करून जर खरोखर माझ्या प्रवासाचा हेतू यशस्वी करीत असलास तर,
43 ४३ मी येथे या झऱ्याजवळ उभा आहे, आणि असे होऊ दे की, जी मुलगी पाणी काढण्यास येईल आणि जिला मी म्हणेन, “मी तुला विनंती करतो, तू आपल्या घागरीतले थोडे पाणी मला प्यायला दे,”
44 ४४ तेव्हा जी मला म्हणेल, “तुम्ही प्या, आणि मी तुमच्या उंटासाठी ही पाणी काढते” तीच मुलगी माझ्या धन्याच्या मुलासाठी परमेश्वराने निवडलेली आहे असे मी समजेन.
45 ४५ मी माझ्या मनात बोलणे संपण्याच्या आत पाहा रिबका खांद्यावर घागर घेऊन बाहेर आली. ती विहिरीत खाली उतरली आणि पाणी काढले. मग मी तिला म्हणालो, “मुली, कृपा करून मला थोडे पाणी प्यायला दे.”
46 ४६ तेव्हा तिने लगेच खांद्यावरून घागर उतरली आणि म्हणाली, “प्या आणि मी तुमच्या उंटांनाही पाणी पाजते.” मग मी प्यालो आणि तिने उंटांनाही पाणी पाजले.
47 ४७ मग मी तिला विचारले, “तू कोणाची मुलगी आहेस?” ती म्हणाली, “नाहोरापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची मी मुलगी,” तेव्हा मग मी तिला सोन्याची नथ आणि हातात घालण्यासाठी सोन्याच्या दोन बांगडया दिल्या.
48 ४८ नंतर मी मस्तक लववून माझा धनी अब्राहाम याचा देव परमेश्वर याची स्तुती केली, कारण त्याने मला माझ्या धन्याच्या भावाच्या मुलीला त्याच्या मुलाकडे नेण्याचा योग्य मार्ग दाखवला.
49 ४९ “आता तुम्ही माझ्या धन्याशी प्रामाणिकपणाने आणि सत्याने वागण्यास तयार असाल तर मला सांगा. परंतु जर नाही तर तसे मला सांगा; यासाठी की मी उजवीकडे किंवा डावीकडे वळेन.”
50 ५० मग लाबान व बथुवेल यांनी उत्तर दिले, “ही गोष्ट परमेश्वराकडून आली आहे. आम्ही तुम्हास बरे किंवा वाईट काही बोलू शकत नाही.
51 ५१ पाहा, रिबका तुमच्यासमोर आहे. तिला तुम्ही घेऊन जा आणि परमेश्वर बोलल्याप्रमाणे ती तुमच्या धन्याच्या मुलाची पत्नी व्हावी.”
52 ५२ जेव्हा अब्राहामाच्या सेवकाने हे त्यांचे शब्द ऐकले, तेव्हा त्याने भूमीपर्यंत वाकून परमेश्वर देवाला नमन केले.
53 ५३ सेवकाने सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने व वस्त्रे रिबकेला दिली. त्याने तिचा भाऊ व तिची आई यांनाही मोलवान देणग्या दिल्या.
54 ५४ मग त्याने व त्याच्या बरोबरच्या माणसांनी त्यांचे खाणे व पिणे झाल्यावर रात्री तेथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ते म्हणाले, “आता मला माझ्या धन्याकडे पाठवा.”
55 ५५ तेव्हा तिची आई व भाऊ म्हणाले, “रिबकेला आमच्याजवळ थोडे दिवस म्हणजे निदान दहा दिवस तरी राहू द्या. मग तिने जावे.”
56 ५६ परंतु तो त्यांना म्हणाला, “मला थांबवून घेऊ नका, कारण परमेश्वराने माझा मार्ग यशस्वी केला आहे, मला माझ्या मार्गाने पाठवा जेणेकरून मी माझ्या धन्याकडे जाईन.”
57 ५७ ते म्हणाले, “आम्ही मुलीला बोलावून तिला विचारतो.”
58 ५८ मग त्यांनी रिबकेला बोलावून तिला विचारले, “या मनुष्याबरोबर तू जातेस काय?” तिने उत्तर दिले, “मी जाते.”
59 ५९ मग त्यांची बहीण रिबका, तिच्या दाईसोबत अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे यांच्या बरोबर प्रवासास निघाली.
60 ६० त्यांनी रिबकेला आशीर्वाद दिला आणि तिला म्हटले, “आमच्या बहिणी, तू हजारो लाखांची आई हो, आणि तुझे वंशज त्यांचा द्वेष करणाऱ्यांच्या वेशीचा ताबा घेवोत.”
61 ६१ मग रिबका उठली व ती व तिच्या दासी उंटावर बसल्या आणि त्या मनुष्याच्या मागे गेल्या. अशा रीतीने सेवकाने रिबकेला घेतले आणि त्याच्या मार्गाने गेला.
62 ६२ इकडे इसहाक नेगेब येथे राहत होता आणि नुकताच बैर-लहाय-रोई विहिरीपासून परत आला होता.
63 ६३ इसहाक संध्याकाळी मनन करण्यास शेतात गेला होता. त्याने आपली नजर वर केली व पाहिले तेव्हा त्यास उंट येताना दिसले.
64 ६४ रिबकेने नजर वर करून जेव्हा इसहाकाला पाहिले तेव्हा ती उंटावरून उडी मारून खाली उतरली.
65 ६५ ती सेवकाला म्हणाली, “शेतातून आपल्याला भेटावयास सामोरा येत असलेला पुरुष कोण आहे?” सेवकाने उत्तर दिले, “तो माझा धनी आहे.” तेव्हा तिने बुरखा घेतला आणि स्वतःला झाकून घेतले.
66 ६६ सेवकाने इसहाकाला सर्व गोष्टी, त्याने काय केले त्याविषयी सविस्तर सांगितले.
67 ६७ मग इसहाकाने मुलीला आपली आई सारा हिच्या तंबूत आणले. आणि त्याने रिबकेला स्विकारले, आणि ती त्याची पत्नी झाली, आणि त्याने तिच्यावर प्रेम केले. अशा रीतीने आपल्या आईच्या मरणानंतर इसहाक सांत्वन पावला.