< यहेज्केल 42 >
1 १ नंतर त्या मनुष्याने मला उत्तरेकडून बाहेरच्या अंगणात आणले आणि मग त्याने मला ती सोडलेली जागा आणि उत्तरेकडील इमारत यासमोरील खोल्या असलेल्या इमारतीत आणले.
2 २ शंभर हात लांबीच्यासमोर तिच्या उत्तरेकडचा प्रवेश होता आणि इमारतीची रुंदी पन्नास हात होती.
3 ३ आंतील अंगणासमोर वीस हात व बाहेरील अंगणाच्या इमारतीसमोर तिसऱ्या मजल्याला समोरासमोर सज्जे होते.
4 ४ खोल्यासमोर दहा हात रुंद व शंभर हात लांब असा एक रस्ता होता; त्याचे दरवाजे उत्तरेकडे होते.
5 ५ पण या इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावरील जागा सज्ज्यात गुंतली होती म्हणून तेथल्या खोल्या, मधल्या व खालच्या मजल्यावरील खोल्यांपेक्षा लहान होत्या.
6 ६ कारण त्या खोल्यांचे तीन मजले होते. त्यांना अंगणातल्या खांबासारखे खांब नव्हते. म्हणून सर्वांत वरच्या मजल्यावरील खोल्या मधल्या व खालच्या मजल्यापेक्षा लहान होत्या.
7 ७ आणि त्या खोल्यांशी समांतर अशी खोल्यांसमोरील बाहेरच्या बाजूला, खोल्यांना समांतर अशी भिंत होती. ती बाहेरच्या अंगणापर्यंत गेलेली एक भिंत होती; तिची लांबी पन्नास हात होती.
8 ८ कारण बाहेरच्या अंगणाच्या खोल्यांची लांबी पन्नास हात होती. मंदिराच्या समोर शंभर हात होती.
9 ९ या खोल्यांच्या खालून पूर्वेस प्रवेशद्वार होते, त्यातून बाहेरच्या अंगणातून येणारे त्या खोल्यांत जात असत.
10 १० अंगणाच्या भिंतीला लागून पूर्वेकडे, सोडलेल्या जागेसमोर व मंदिराच्या अंगणासमोर बाहेरच्या बाजूलाही खोल्या होत्या.
11 ११ उत्तरेकडील खोल्यासमोर जसा रस्ता होता तसा त्याच्या समोरही रस्ता होता. त्यांची लांबी-रुंदी, त्यांच्या बाहेर जाण्याच्या सर्व वाटा व त्यांची एकंदर व्यवस्था त्यांच्याप्रमाणेच होती.
12 १२ उत्तरेकडील दारांसारखेच दक्षिणेकडे असलेल्या खोल्यांचे दारे होती; रहदारीच्या तोंडाजवळ म्हणजे उजव्या भिंतीजवळील रस्त्यावरून त्या दारातून पूर्वेकडून येणारे लोक प्रवेश करीत असत.
13 १३ मग तो मनुष्य मला म्हणाला, “अंगणाच्या समोर असलेल्या उत्तर व दक्षिणेकडील खोल्या या पवित्र असून त्यामध्ये परमेश्वराजवळ जाणारे याजक परमपवित्र पदार्थ खातील. तेथे ते परमपवित्र पदार्थ, अन्नार्पण, पापार्पण व दोषार्पण ठेवतील, कारण ते स्थान पवित्र आहे.
14 १४ जेव्हा याजक तेथे प्रवेश करतील, तेव्हा त्यांनी पवित्रस्थानातून बाहेरच्या अंगणात जाऊ नये तर ज्या वस्त्रांनी ते सेवा करतात ती त्यांनी बाजूला तेथेच उतरवून ठेवावी कारण ती वस्त्रे पवित्र आहेत. म्हणून त्यांनी लोकांपुढे जाण्याआधी दुसरी वस्रे घालावी.”
15 १५ आतील मंदिराचे मोजमाप करून झाल्यावर त्या मनुष्याने मला पूर्वेकडच्या दारातून बाहेर आणले आणि तेथे त्यांने सर्व सभोवतालच्या बाजूंचे मोजमाप केले.
16 १६ त्याने ते मापावयाच्या काठीने मापले, पूर्वेकडे मापण्याच्या काठीने पांचशे हात मापले.
17 १७ त्याने उत्तरेची बाजू मोजली. ती मापण्याच्या काठीने पाचशे हात भरली.
18 १८ त्याने दक्षिणेची बाजू सुद्धा मोजली. ती मापण्याच्या काठीने पांचशे हात भरली.
19 १९ मग तो वळला आणि पश्चिमेची बाजू मोजली, मापण्याच्या काठीने पांचशे हात भरली.
20 २० त्याने चारी बाजूंनी मोजमाप केले. पवित्रस्थळे व अपवित्र स्थळे एकमेकांपासून वेगळी ठेवण्यासाठी त्यास सभोवती भिंत होती. तिची लांबी पांचशे हात व रुंदी पांचशे हात होती.