< उपदेशक 4 >
1 १ मी पुन्हा एकदा जे सर्व जाचजुलूम भूतलावर करण्यात येतात ते पाहिले. पीडीलेल्यांच्या अश्रुकडे पाहा. तेथे त्यांचे समाधान करणारा कोणी नाही. त्याजवर जाचजुलूम करणाऱ्यांच्या हातात बळ आहे. पण पीडीलेल्यांचे समाधान करणारा कोणी नाही.
2 २ म्हणून मी मरण पावलेल्यांचे अभिनंदन करतो. जे आज जिवंत आहेत, व अद्याप जगत आहेत त्यांचे नव्हे,
3 ३ जो अजून उत्पन्न झाला नाही, जे वाईट कृत्ये भूतलावर करतात ते त्याने पाहिलेच नाही, तो त्या दोघांपेक्षा बरा आहे असे मी समजतो.
4 ४ नंतर मी पाहिले की, सर्व कष्ट व कारागिरीचे प्रत्येक काम असे आहे की, त्यामुळे त्याचा शेजारी त्याचा हेवा करतो. हेही व्यर्थ आहे व हे वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहे.
5 ५ मूर्ख हाताची घडी घालून स्वस्थ बसतो आणि काही काम करत नाही, त्याचा देह त्याचे अन्न आहे.
6 ६ परंतु भरलेल्या दोन मुठीपेक्षा व वायफळ प्रयत्नापेक्षा स्वस्थपणे कार्य करून मूठभर लाभ मिळविणे हे चांगले आहे.
7 ७ मग मी पुन्हा निरर्थकतेबद्दल विचार केला, भूतलावरील व्यर्थ गोष्टी पाहिल्या.
8 ८ तेथे अशाप्रकारचा कोणी मनुष्य आहे, तो एकटाच असून त्यास दुसरा कोणी नाही. त्यास मुलगा किंवा भाऊ नाही. परंतु तेथे त्याच्या कष्टाला अंत नाही. मिळकतीच्या धनाने त्याच्या नेत्राचे समाधान होत नाही. तो स्वतःशीच विचार करून म्हणतो, मी इतके कष्ट कोणासाठी करीत आहे? आणि माझ्या जिवाचे सुख हिरावून घेत आहे? हेही व्यर्थ आहे, वाईट कष्टमय आहे.
9 ९ एकापेक्षा काम करणारे दोन माणसे बरी आहेत. कारण त्यांच्या एकत्र श्रमाने ते चांगले वेतन मिळवू शकतात.
10 १० जर एखादा पडला तर त्याचा दुसरा मित्र त्यास उचलतो. पण जो एकटाच असून पडतो त्यास उचलण्यास कोणी नसते, त्याच्यामागे दुःख येते.
11 ११ आणि जर दोघे एकत्र झोपले तर त्यांना ऊब येऊ शकते. परंतु एकट्याला ऊब कशी काय येऊ शकेल?
12 १२ जो मनुष्य एकटा आहे त्यास कोणी भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल. तीन पदरी दोरी सहसा तुटत नाही.
13 १३ गरीब पण शहाणा असलेला तरुण नेता हा वृध्द आणि मूर्ख राजापेक्षा चांगला असतो. तो वृध्द राजा त्यास दिलेल्या इशाऱ्यांकडे लक्ष देत नाही.
14 १४ कदाचित तो तरुण राजा जन्माने गरीब असेल किंवा तो तुरुंगातून राज्य करायला बाहेर आला असेल.
15 १५ तथापि, जे सर्व जिवंत भूतलावर चालतात त्यांना मी पाहिले, जो दुसरा तरुण त्याच्या जागी राजा म्हणून उभा राहिला ते त्यास शरण गेले.
16 १६ त्या सर्व लोकांचा म्हणजे ज्या सर्वांवर तो अधिकारी झाला त्यांचा, काही अंत नव्हता. तरी जे लोक पुढे होणार आहेत ते त्याच्याविषयी आनंद करणार नाहीत. खचित ही परीस्थिती व्यर्थ आहे आणि हे वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहे.