< उपदेशक 10 >
1 १ जसे मरण पावलेल्या माशा गंध्याचे सुगंधी तेल दुर्गंधीत करतात. त्याचप्रमाणे थोडासा मूर्खपणा खूपशा शहाणपणाचा आणि सन्मानाचा नाश करू शकतो.
2 २ शहाण्याचे मन त्याच्या उजवीकडे आहे. पण मूर्खाचे मन त्याच्या डावीकडे असते.
3 ३ जेव्हा मूर्ख रस्त्यावरून चालतो त्याचे विचार अर्धवट असतात. तो मूर्ख आहे हे प्रत्येकाला दिसते.
4 ४ तुमचे वरिष्ठ तुमच्यावर रागावले आहेत म्हणून तुम्ही तुमची कामे सोडू नका. शांत राहिल्याने मोठा असह्य संताप शांत होतो.
5 ५ एक अनर्थ तो मी पृथ्वीवर पाहिला आहे, अधिकाऱ्याच्या चुकीने येतो ते मी पाहिले आहे.
6 ६ मूर्खांना नेतेपदाची जागा दिली जाते, आणि यशस्वी मनुष्यांना खालची जागा दिली जाते.
7 ७ मी दासास घोड्यावरून जाताना पाहिले, आणि जे यशस्वी लोक होते त्यांना दासाप्रमाणे जमिनीवरून चालताना पाहिले.
8 ८ जो कोणी खड्डा खणतो, तोच त्यामध्ये पडू शकतो आणि जो कोणी भिंत तोडून टाकतो त्यास साप चावण्याची शक्यता असते.
9 ९ जो कोणी दगड फोडतो त्यास त्यामुळे इजा होऊ शकते. आणि जो लाकडे तोडतो तो संकटात असतो.
10 १० लोखंडी हत्यार बोथटले व त्यास धार लावली नाही तर अधिक जोर लावावा लागतो. परंतु कार्य साधण्यासाठी ज्ञान उपयोगाचे आहे.
11 ११ जर सर्पावर मंत्रप्रयोग होण्यापूर्वी तो डसला तर पुढे मांत्रिकाचा काही उपयोग नाही.
12 १२ शहाण्याच्या तोंडची वचने कृपामय असतात. परंतु मूर्खाचे ओठ त्यालाच गिळून टाकतील.
13 १३ त्याच्या मुखाच्या वचनांचा प्रारंभ मूर्खपणा असतो. आणि त्याच्या भाषणाचा शेवट अपाय करणारे वेडेपण असते.
14 १४ मूर्ख वचने वाढवून सांगतो, पण पुढे काय येणार आहे हे कोणाला माहित नाही. त्याच्यामागे काय होईल ते त्यास कोण सांगेल?
15 १५ मूर्ख श्रम करून थकतो, कारण नगराला जाण्याचा मार्ग तो जाणत नाही.
16 १६ हे देशा, तुझा राजा जर बालकासारखा असला, आणि तुझे अधिपती सकाळी मेजवाणीला सुरवात करतात तर तुझी केवढी दुर्दशा!
17 १७ पण जेव्हा तुझा राजा उच्चकुलीनांचा मुलगा आहे, आणि तुझे अधिपती नशेसाठी नाहीतर शक्तीसाठी सुसमयी जेवतात तेव्हा तुझा देश आनंदीत आहे.
18 १८ जर एखादा मनुष्य कामाच्या बाबतीत खूप आळशी असेल तर त्याचे घर गळायला लागेल आणि त्याचे छत कोसळून पडेल.
19 १९ लोक हसण्याकरता मेजवाणी तयार करतात, द्राक्षरस जीवन आनंदीत करतो. आणि पैसा प्रत्येकगोष्टीची गरज पुरवतो.
20 २० तू आपल्या मनातही राजाला शाप देऊ नको. आणि श्रीमंताला आपल्या झोपण्याच्या खोलीतही शाप देऊ नको. कारण आकाशातले पाखरू तुझे शब्द घेऊन जाईल, आणि जे काही पक्षी आहेत ते गोष्टी पसरवतील.