< अनुवाद 29 >
1 १ इस्राएलाशी होरेब पर्वताजवळ परमेश्वराने पवित्र करार केला होता. त्याखेरीज, मवाबात देखील पवित्र करार करायची परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली. तो पवित्र करार हा होय:
2 २ मोशेने सर्व इस्राएलांना बोलावून सांगितले, मिसर देशामध्ये परमेश्वराने जे जे केले ते सर्व तुम्ही पाहिले आहे. फारो, त्याचे सेवक आणि त्याचा देश यांचे परमेश्वराने काय केले ते तुम्ही पाहिले आहे.
3 ३ ती महान संकटे, चिन्हे व मोठे चमत्कार तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहीले आहेत.
4 ४ पण आजपर्यंतही परमेश्वराने तुम्हास समजायला मन, बघण्यास डोळे व ऐकण्यास कान दिलेले नाही.
5 ५ परमेश्वराने तुम्हास वाळवंटातून चाळीस वर्षे चालवले. पण एवढ्या कालावधीत तुमचे कपडे विरले नाहीत की जोडे झिजले नाहीत.
6 ६ तुम्ही भाकरी खाल्ली नाही की द्राक्षरस अथवा मद्य प्यायला नाही. हा परमेश्वरच तुमचा देव आहे हे तुम्हास कळावे म्हणून त्याने असे केले.
7 ७ तुम्ही येथे आलात आणि हेशबोनचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग आपल्यावर चढाई करून आले. पण आपण त्यांचा पराभव केला.
8 ८ त्यांचा देश आपण घेऊन तो रऊबेनी, गादी व मनश्शेचे अर्धे घराणे यांना इनाम म्हणून दिला.
9 ९ या करारातील सर्व आज्ञा तुम्ही पाळल्यात तर तुम्हास सर्व कार्यात असेच यश मिळत राहील.
10 १० आज तुम्ही सर्वजण म्हणजेच तुमच्यातील अंमलदार वडिलधारे, प्रमुख आणि सर्व इस्राएल वंशज, तुमचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर उभे आहात.
11 ११ तुमची बायकामुले तसेच लाकूड तोड्यापासून पाणक्यापर्यंत तुमच्या छावणीतले सर्व उपरे ही आज याकरीता उभे आहेत.
12 १२ तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशी करारबद्ध व्हायला तुम्ही इथे जमलेले आहात. परमेश्वर तुमच्याशी पवित्र करार करणार आहे.
13 १३ त्याद्वारे तो तुम्हास आपली खास प्रजा करणार आहे आणि तो तुमचा परमेश्वर बनणार आहे. त्याने हे तुम्हास आणि अब्राहाम, इसहाक व याकोब या तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे.
14 १४ हा शपथपूर्वक पवित्र करार फक्त आपल्याशी आज इथे करतो असे नव्हे,
15 १५ तर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आज आपल्यामध्ये या ठिकाणी हजर असलेल्या व हजर नसलेल्यासाठीही आहे.
16 १६ आपण मिसरमध्ये कसे राहत होतो ते तुम्हास आठवत आहेच. वेगवेगळ्या राष्ट्रातून येथपर्यंतचा आपण प्रवास कसा केला हे तुम्हास माहीतच आहे.
17 १७ त्या लोकांच्या लाकूड, पाषाण, चांदी, सोने यापासून बनवलेल्या मूर्ती व इतर अमंगळ वस्तूही पाहील्या,
18 १८ आपल्या परमेश्वर देवापासून परावृत्त होऊन त्यांच्या दैवतांच्या भजनी लागलेला कोणी पुरुष, स्त्री, एखादे कुटुंब किंवा कुळ येथे नाही ना याची खात्रीकरुन घ्या. अशी माणसे विष व कडूदवणा प्रमाणे असतात.
19 १९ एखादा हे कराराचे बोलणे ऐकूनही, मी मला हवे तेच करणार. माझे चागंलेच होईल असे स्वत: चे समाधान करून घेत असेल. तर त्याचा त्यास त्रास होईलच पण सुक्याबरोबर ओले ही जळून जाईल.
20 २० परमेश्वर अशा मनुष्यास क्षमा करणार नाही. परमेश्वराचा त्याच्यावर भयानक कोप होईल. या ग्रंथातील सर्व शाप त्यास लागतील, आणि परमेश्वर भुतलावरून त्याची नावनिशाणी पुसून टाकील.
21 २१ या नियमशास्त्राच्या ग्रंथातील करारात लिहिलेला आहे. त्यातल्या सर्व शापाप्रमाणे परमेश्वर त्यांच्या वाइटासाठी त्यास इस्राएलाच्या सर्व वंशातून घालवून देईल.
22 २२ या देशाचा कसा नाश झाला हे पुढे तुमचे वंशज आणि दूरदूरच्या देशातील परकीय पाहतील. या देशातील विपत्ती याप्रकारे परमेश्वराने पसरवलेले रोग ते पाहतील.
23 २३ येथील भूमी गंधक आणि खार यांच्यामुळे जळून वैराण होईल. तिच्यात गवताचे पाते देखील उगवणार नाही. सदोम, गमोरा, अदमा व सबोयिम ही शहरे परमेश्वराच्या कोपाने उद्ध्वस्त झाली तसेच या देशाचे होईल.
24 २४ “परमेश्वराने या देशाचे असे का केले? त्याचा एवढा कोप का झाला?” असे इतर राष्ट्रांतील लोक विचारतील.
25 २५ त्याचे उत्तर असे की, “आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याशी केलेला करार इस्राएलांनी धुडकावून लावल्यामुळे परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. मिसरमधून या लोकांस बाहेर आणल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी पवित्र करार केला होता तो यांनी मोडला.
26 २६ हे इस्राएल इतर दैवतांची पूजा करु लागले. यापूर्वी त्यांना हे देव माहीत नव्हते. तसेच इतर दैवतांची पूजा करु नये असे परमेश्वराने त्यांना बजावले होते.
27 २७ म्हणून त्यांच्यावर परमेश्वर क्रुद्ध झाला व या ग्रंथातील शापवाणी त्यांच्याबाबतीत खरी करून दाखवली.
28 २८ क्रोधीष्ट होऊन परमेश्वराने त्यांचे या देशातून उच्चाटन केले व आज ते जेथे आहेत तेथे त्यांची रवानगी केली?”
29 २९ काही गोष्टी आमचा देव परमेश्वर ह्याने गुप्त ठेवलेल्या आहेत. त्या फक्त त्यालाच माहीत. पण हे बाकी सर्व त्याने उघड केले आहे. आपल्याला व आपल्या पुढील पिढ्यांसाठी शिकवण देऊन ती नित्य पाळायला सांगितले आहे.