< दानीएल 9 >
1 १ दारयावेश राजा जो अहश्वेरोशाचा पुत्र माद्य वंशातून आलेला तो अहश्वेरोश ज्यास खास्द्यांचा राजा करण्यात आले होते.
2 २ दरयावेशाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मी दानीएल, परमेश्वराचे वचन असलेल्या पुस्तकाचा अभ्यास करत होतो, ते वचन जे यिर्मया संदेष्टयाच्याद्वारे प्राप्त झाले. माझ्या लक्षात असे आले की, यरूशलेमेच्या ओसाड दशेचा वेळ पुरा होण्यास सत्तर वर्षे लागतील.
3 ३ मी हे जाणून माझे मुख परमेश्वर देवाकडे वळवले, यासाठी की उपास करून व गोणताट व राख अंगावर घेऊन प्रार्थना व विनंत्या यांनी त्यास मागणे करावे.
4 ४ मी माझा देव, “परमेश्वराची प्रार्थना करून पापांची कबूली दिली. मी म्हणालो, हे थोर आणि भयावह देवा, तू महान आहे, जे तुझ्यावर प्रेम करतात व तुझ्या आज्ञा पालन करतात त्यांच्याशी तू आपला करार पाळतो.
5 ५ आम्ही पाप केले आणि आम्ही कुटीलतेने वागलो आणि बंड झालो तुझे नियम आणि तुझ्या निधीपासून वळलो.
6 ६ तुझे दास जे संदेष्टे तुझ्या नामाने आमचे राजे, सरदार वडिल आणि देशाचे सर्व लोक हयांच्याशी बोलले तेव्हा आम्ही ऐकले नाही.
7 ७ आमच्या देवा, हे परमेश्वरा धार्मिकता, न्यायत्व तुझे आहे तथापि आज आमची तोंडे लज्जीत झाली आहेत. यहूदाचे यरूशलेमेत राहणारे सर्व इस्राएलाचे सर्व निवासी त्यामध्ये आहेत, त्यांनी तुझ्या विरूद्ध केलेल्या अपराधामुळे, त्यांना तू सर्व देशात विखुरले होते कारण आम्ही तुझ्या विरोधात पाप केले.
8 ८ हे परमेश्वरा आमच्या तोंडाला काळे लागले आहे कारण आमचे राजे, आमचे सरदार आणि पूर्वज आम्ही सर्वांनी तुझ्या विरोधात पाप केले आहे.
9 ९ आमचा देव परमेश्वर दयेचा व क्षमेचा सागर आहे; आम्ही त्याच्याबरोबर फितुरी केली.
10 १० आम्ही आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकली नाही, तसेच जी त्याने आपल्या नियमशास्त्राद्वारे त्याच्या संदेष्ट्यांकडून दिली होती.
11 ११ सर्व इस्राएलाने तुझी वाणी नाकारून तुझ्या नियमाशास्त्राविरोधात पाप केले आहे. देवाचा सेवक मोशे यांच्याद्वारे लिहिलेल्या शापाचा आणि शपथेचा वर्षाव आमच्यांवर झाला आहे, कारण त्याच्या विरोधात पाप केले.
12 १२ परमेश्वराने आमच्या आणि आमच्या शासकाच्या विरोधात बोललेल्या वचनाची खात्री आमच्यावर अरिष्ट पाठवून केली आहे. यरूशलेमेवर जे संकट आले तसे आकाशाखाली कोठेही झाले नाही.
13 १३ मोशेच्या नियमशास्त्रात लिहील्याप्रमाणे ही सर्व विपत्ती आमच्यावर आली, तरी आम्ही पश्चाताप करून आपला देव परमेश्वर याच्या दयेची आणभाक केली नाही.
14 १४ म्हणून आता परमेश्वराने अरिष्टावर नजर ठेवून ते आम्हावर आणले आहे, कारण परमेश्वर आमचा देव जी सगळी कामे करतो त्यामध्ये तो न्यायी आहे; आणि आम्ही त्याचा शब्द मानला नाही.
15 १५ प्रभू आमच्या देवा, तू आपले लोक मिसर देशातून प्रतापी हाताने बाहेर आणले, आणि आज आहे त्याप्रमाणे आपणाला किर्ती प्राप्त करून घेतली आहे; आम्ही पाप केले आहे, आम्ही दुष्टाईने वागलो आहे.
16 १६ हे प्रभू, आपल्या सर्व न्यायकृत्याप्रमाणे यरूशलेम नगरीवरील, तुझ्या पवित्र पर्वतावरील, आपला क्रोध व संताप दूर कर; आमच्या पातकांमुळे व आमच्या पूर्वजांच्या दुष्कर्मांमुळे यरूशलेम व तुझे लोक आसपासच्या सर्वांना निंदेचे विषय झाले आहेत.
17 १७ हे आमच्या देवा, आपल्या सेवकाच्या प्रार्थना व विनविण्याकडे कान दे; प्रभू, तुझ्या ओसाड झालेल्या स्थानावर आपला प्रकाश पाड.
18 १८ देवा ऐक, देवा क्षमा कर, देवा लक्ष दे आणि कार्य कर तुझ्या नावासाठी उशीर करू नको, माझ्या देवा, कारण तुझ्या शहरास आणि तुझ्या लोकांस तुझे नाव दिले आहे. कारण आम्ही आपल्या न्यायीपणामुळे आपल्या विनंत्या तुझ्यापुढे ठेवतो असे नाही, तर तुझ्या अपार दयेमुळे त्या तुझ्यापुढे ठेवतो.
19 १९ हे प्रभू, ऐक, हे प्रभू, क्षमा कर, हे प्रभू, कान दे, आणि कार्य कर, उशीर करू नको; हे माझ्या देवा, तू आपणाकरता असे कर, कारण तुझ्या नगराला व तुझ्या लोकांस तुझे नाव आहे.
20 २० आणि मी बोलत व प्रार्थना करीत असता आणि आपले पाप व आपले लोक इस्राएल यांचे पाप कबूल करीत असता, आणि आपल्या देवाच्या पवित्र पर्वताकरिता परमेश्वर माझा देव याच्यापुढे माझी विनंती सादर करीत होतो.
21 २१ मी प्रार्थना करत असता पहिल्याने ज्याला मी माझ्या दृष्टांतात पाहिले तो गब्रीएल तो संध्याकाळच्या यज्ञसमयी माझ्यासमीप आला.
22 २२ आणि तो मला समज देत असतांना माझ्याशी बोलत म्हणाला, दानीएला, तुला ज्ञान व समज देण्यासाठी मी आता निघून आलो आहे.
23 २३ तुझ्या विनंत्यांच्या आरंभी वचन निघाले, आणि ते प्रगट करायला मी आलो आहे, कारण तू फारच प्रिय आहेस; म्हणून या गोष्टीचा विचार कर आणि दृष्टांत समजून घे.
24 २४ सत्तर सप्तकांचा काळ तुझ्या लोकांसाठी आणि तुझ्या शहरासाठी घोषीत करण्यात आला होता; ज्यात पापाचा अंत व्हावा, अधार्मिकतेसाठी प्रायश्चित करावे, सनातन धार्मिकता उदयास यावी, दृष्टांत व स्वप्न पूर्ण व्हावे आणि पवित्रस्थानाचा अभिषेक व्हावा.
25 २५ हे जाण आणि समजून घे की, यरूशलेमेची पुनर्बांधणी करण्याची आज्ञा झाल्यापासून तर अभिषिक्त पुढारी येईपर्यंतचा अवकाश सात सप्तके आणि बासष्ट आठवडे आहे. त्यानंतर यरूशमेलेची पुनर्बांधणी होईल; आणि संकटाच्या काळातही खंदक आणि कोट यांसह ती बांधण्यात येईल.
26 २६ बासष्ट आठवड्यानंतर अभिषिक्ताचा वध करण्यात येईल व त्याकडे काही उरणार नाही जो येणारा अधिपती त्याचे सैन्य शहर आणि वेदी यांचा नाश करतील, त्याचा नाश पुराने होईल युध्द शेवटपर्यंत होईल सर्व काही उजाड होण्याची घोषणा झाली आहे.
27 २७ एक सप्तकाचा करार तो पुष्कळासोबत पक्का करेल, सप्तकाच्या मध्यात तो यज्ञ आणि अर्पणे बंद करील. नाश करणारा अमंगळाच्या पंखावर स्वार होऊन येईल. संपूर्ण नाश आणि अंत ठरलेला आहे. नाश करणाऱ्यावर त्याचा वर्षाव करण्यात येईल.”