< २ तीम. 1 >
1 १ ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या जीवनाविषयीच्या अभिवचनाची घोषणा करण्यास, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याजकडून,
2 २ प्रिय मुलगा तीमथ्य याला, देवपिता आणि ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्यापासून कृपा, दया व शांती असो.
3 ३ माझ्या पूर्वजांप्रमाणे ज्या देवाची मी शुद्ध विवेकभावाने सेवा करतो, त्या देवाचे मी उपकार मानतो आणि रात्रंदिवस माझ्या प्रार्थनेत तुझी नेहमी आठवण करतो.
4 ४ तुझी आसवे आठवून तुला भेटण्याची उत्कंठा धरतो ह्यासाठी की मी आनंदाने पूर्ण व्हावे.
5 ५ तुझ्यातील निष्कपट विश्वासाची मला आठवण होते जो पहिल्यांदा तुझी आजी लोईसमध्ये होता आणि तुझी आई युनीकेमध्ये होता आणि माझी खात्री आहे की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे.
6 ६ या कारणासाठी मी तुला आठवण करून देतो की, देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामूळे तुझ्या ठायी आहे, ते प्रज्वलित कर.
7 ७ कारण देवाने आम्हास भित्रेपणाचा आत्मा दिला नाही तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे.
8 ८ म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरु नको किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाज धरू नको. तर सुवार्तेसाठी देवाच्या सामर्थ्याप्रमाणे तू माझ्याबरोबर दुःखाचा वाटा घे.
9 ९ त्याने आम्हास तारले आणि पवित्र पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा युगाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हास दिली होती. (aiōnios )
10 १० पण जी आता आम्हास आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रकट होण्याने दाखवली गेली आहे. ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे अविनाशीपण व जीवन प्रकाशात आणले.
11 ११ मला त्या सुवार्तेचा घोषणाकर्ता, प्रेषित आणि शिक्षक असे नेमले होते.
12 १२ आणि या कारणामुळे मीसुद्धा दुःख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्यास मी ओळखतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपवले आहे त्याचे तो रक्षण करील.
13 १३ ज्या सुवचनांचा नमुना तू माझ्यापासून ऐकून घेतला, तो नमुना ख्रिस्त येशूतील विश्वास व प्रीती यामध्ये बळकट धर.
14 १४ आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे त्या चांगल्या ठेवीचे रक्षण कर.
15 १५ आशिया प्रांतामध्ये असणाऱ्या सर्वांनी मला सोडले आहे हे तुला ठाऊकच आहे. त्यामध्ये फुगल व हर्मगनेस आहेत.
16 १६ अनेसिफरच्या घरावर प्रभू दया दाखवो कारण त्याने अनेकदा माझे समाधान केले आहे आणि माझ्या तुरूंगात असण्याची त्यास लाज वाटली नाही.
17 १७ उलट रोम शहरामध्ये असताना त्याने माझा तपास लागेपर्यंत झटून माझा शोध केला.
18 १८ प्रभू करो आणि त्यास त्यादिवशी प्रभूकडून दया मिळो कारण माझ्या इफिसात कितीतरी प्रकारे माझी सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.