< 2 शमुवेल 5 >
1 १ इस्राएलच्या सर्व घराण्यांमधील लोक हेब्रोन येथे दावीदाजवळ एकत्र आले आणि त्यास म्हणाले, आपण इस्राएल लोक एकाच कुटुंबातले, एकाच हाडामांसाचेआहोत.
2 २ शौल राज्यावर होता तेव्हा सुध्दा तुम्हीच युध्दात आमचे नेतृत्व करत होता. इस्राएलांना युध्दावरून तुम्हीच परत आणत होता. खुद्द परमेश्वर तुम्हास म्हणाला, “माझ्या इस्राएल प्रजेचा तू मेंढपाळ होशील. इस्राएलवर राज्य करशील.”
3 ३ मग इस्राएल मधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाला भेटायला हेब्रोन येथे आली. दावीदाने या सर्वांबरोबर परमेश्वरासमक्ष करार केला. त्यानंतर दावीदाला त्या सर्वांनी इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला.
4 ४ दावीद राज्य करायला लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता. त्याने चाळीस वर्षे राज्य केले.
5 ५ हेब्रोनमध्ये यहूदावर त्याने साडेसात वर्षे राज्य केले आणि तेहतीस वर्षे सर्व इस्राएल आणि यहूदावर यरूशलेमेमधून राज्य केले.
6 ६ राजाने आपले लोक बरोबर घेऊन यरूशलेम येथे राहणाऱ्या यबूसी लोकांवर स्वारी केली तेव्हा ते यबूसी दावीदाला म्हणाले, “तू आमच्या नगरात प्रवेश करू शकणार नाहीस, आमच्या येथील आंधळे आणि पांगळे सुध्दा तुम्हास थोपवतील. दावीदाला आपल्या नगरात प्रवेश करणे जमणार नाही असे त्यांना वाटले म्हणून ते असे म्हणाले.”
7 ७ तरीपण दावीदाने सियोन किल्ला घेतला. दावीदपुर असे त्याचे नाव पडले.
8 ८ दावीद त्या दिवशी आपल्या लोकांस म्हणाला, “यबूसी लोकांचा पराभव करायचा असेल तर खंदकमार्गे जा आणि त्या आंधळ्या पांगळ्या दावीदाच्या शत्रूंना गाठा. यावरूनच, आंधळे पांगळे यांना या देवाच्या घरात येता यायचे नाही अशी म्हण पडली.”
9 ९ दावीदाचा मुक्काम किल्ल्यात होता व त्याचे नाव दावीदपूर असे दिले. मिल्लो नामक भाग त्याने उभारला. नगराच्या आत त्याने आणखी बऱ्याच इमारती उभारल्या.
10 १० सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या बाजूचा होता म्हणून दावीद अधिकाधिक सामर्थ्यवान होत गेला.
11 ११ सोरेचा राजा हिराम याने आपले दूत दावीदाकडे पाठवले गंधसंरूची झाडे, सुतार, गवंडी हे ही त्याने पाठवले. त्यांनी दावीदासाठी निवासस्थान उभारले.
12 १२ तेव्हा परमेश्वराने आपल्याला खरोखरच इस्राएलाचा राजा केले आहे हे दावीदाला पटले. तसेच देवाने आपल्या लोकांसाठी, इस्राएल राष्ट्रासाठी, त्याच्या (दावीदाच्या) राज्याला महत्व दिले आहे, हे ही त्यास उमगले.
13 १३ हेब्रोनहून आता दावीद यरूशलेम येथे आला. तेथे त्याने आणखी लग्ने केली आणि त्याच्याकडे आता अधिक दासी आणि स्त्रिया होत्या. यरूशलेम येथे त्याच्या आणखी काही मुलांचा जन्म झाला.
14 १४ त्याच्या या यरूशलेम येथे जन्मलेल्या पुत्रांची नावे अशी. शम्मुवा, शोबाब, नाथान, शलमोन,
15 १५ इभार, अलीशवा, नेफेग, याफीय,
16 १६ अलीशामा, एल्यादा आणि अलीफलेट.
17 १७ दावीदाला इस्राएल लोकांनी राज्याभिषेक केल्याचे पलिष्ट्यांनी ऐकले. तेव्हा त्यास शोधून त्याचा वध करण्यासाठी म्हणून ते निघाले. पण हे वृत्त समजल्यावर दावीद यरूशलेम येथील किल्ल्यात आला.
18 १८ पलिष्ट्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला.
19 १९ दावीदाने परमेश्वरास विचारले, “मी पलिष्ट्यांवर चढाई करू का? तुझे साहाय्य मला लाभेल काय?” परमेश्वर उत्तरला, “होय पलिष्ट्यांच्या पराभवात मी तुला खात्रीने मदत करील.”
20 २० तेव्हा दावीद बाल-परासीम येथे गेला आणि त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. दावीद तेव्हा म्हणाला, “खिंडार पडलेल्या धरणातून पाणी घूसावे तसा परमेश्वर माझ्यादेखत शत्रूवर तुटून पडला.” म्हणूनच दावीदाने त्या जागेचे नाव बाल परासीम म्हणजे, खिंडार पाडणारा प्रभू, असे ठेवले.
21 २१ पलिष्ट्यांनी आपल्या देवांच्या मूर्ती त्या ठिकाणीच टाकून दिल्या. दावीदाने आणि त्याच्या मनुष्यांनी त्या तेथून हलवल्या.
22 २२ पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा रेफाईमच्या खोऱ्यात तळ दिला.
23 २३ दावीदाने प्रार्थना केली. यावेळी परमेश्वराने सांगितले, “तेथे जाऊ नको त्यांना वळसा घालून पाठीमागे जा. मग तुतीच्या झाडाजवळ त्यांच्यावर हल्ला कर.
24 २४ तुम्ही झाडावर चढून बसा. त्यांच्या सैन्याच्या चढाईचा आवाज तुम्हास झाडाच्या शेंड्यावरून ऐकू येईल. तेव्हा मात्र झटपट उठाव करा कारण परमेश्वरच पलिष्ट्यांच्या पाडावाला पुढे होईल.”
25 २५ दावीदाने मग परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हालचाली केल्या. पलिष्ट्यांचा पराभव केला. गिबापासून गेजेरपर्यंत तो पलिष्ट्यांना मार देत गेला.