< २ करि. 10 >
1 १ पण जो मी, पौल, तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो पण दूर असताना तुमच्याबरोबर कडकपणे वागतो. तो मी तुम्हास ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने विनंती करतो.
2 २ माझे मागणे असे आहे, आम्ही देहाला अनुसरून चालतो असा आमच्याविषयी जे विचार करतात, त्यांच्याबरोबर कडकपणे बोलण्याचा मी ज्या विश्वासाने विचार करीत आहे त्याप्रमाणे मला त्यांच्याविरुद्ध कडक होण्याची गरज पडू नये.
3 ३ कारण, आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देहस्वभावाप्रमाणे युद्ध करत नसतो.
4 ४ कारण आमच्या लढाईची शस्त्रे दैहिक नाहीत, तर देवासाठी तटबंदी नाश करण्यास ती समर्थ आहेत. चुकीच्या वादविवादातून काहीच निष्पन्न होत नाही.
5 ५ तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरूद्ध उंच उभारलेले असे सर्वकाही पाडून टाकून आम्ही प्रत्येक विचार अंकित करून तिला ख्रिस्ता पुढे मान झुकवण्यास लावतो.
6 ६ आणि तुम्ही आज्ञापालनांत पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करण्यास आम्ही सिद्ध आहोत.
7 ७ डोळ्यांपुढे आहे ते पाहा; आपण ख्रिस्ताचे आहोत असा जर कोणाला स्वतःविषयी विश्वास असेल तर त्याने आमच्याविषयी स्वतःशी विचार करावा की, जसे आपण ख्रिस्ताचे आहोत तसे तेही ख्रिस्ताचे आहोत.
8 ८ कारण, प्रभूने आम्हास जो अधिकार दिलेला आहे, तो तुमची उन्नती व्हावी म्हणून दिलेला आहे, तुमचा नाश करण्यास दिलेला नाही, त्याचा मी अधिक अभिमान मिरवल्यास मला लाज वाटणार नाही;
9 ९ म्हणजे मी पत्रांद्वारे भीती घालू पाहतो असे माझ्याविषयी कोणास वाटू नये.
10 १० कारण ते म्हणतात की, “त्यांची पत्रे गंभीर व जोरदार असतात, पण तो शरीराने अशक्त आहे आणि त्याचे बोलणे ऐकण्याच्या लायकीचे नसते.”
11 ११ अशा लोकांनी हे समजून घ्यावे की, आम्ही जसे दूर असताना आमच्या पत्रांतील बोलण्यात असतो, तसे आम्ही जवळ असताना कृतीत असतो.
12 १२ जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात, त्यांच्याबरोबर आम्ही आपणांस समजायला किंवा त्यांच्याशी आपली तुलना करायचे धाडस करीत नाही, ते तर स्वतःस स्वतःकडूनच मोजत असता व स्वतःची स्वतःबरोबरच तुलना करीत असतात हा शहाणपणा नाही.
13 १३ आम्ही आमच्या मर्यादेबाहेर अभिमान मिरवणार नाही; तर देवाने आम्हास लावून दिलेल्या आमच्या मर्यादेच्या आतच मिरवू, ती मर्यादा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे.
14 १४ कारण जणू आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो नव्हतो, अशाप्रकारे आम्ही मर्यादेबाहेर जात नाही कारण आम्ही ख्रिस्ताचे शुभवर्तमान गाजवीत तुमच्यापर्यंत प्रथम पोहचलोच आहोत.
15 १५ आम्ही मर्यादा सोडून दुसर्यांच्या कामात अभिमान मिरवीत नाही; पण आम्हास आशा आहे की, जसा तुमचा विश्वास वाढेल तसा, आमच्या कामाच्या मर्यादेचे प्रमाण अधिक पसरत जाईल.
16 १६ म्हणजे, दुसर्यांच्या कार्यक्षेत्रात आधीच करण्यात आलेल्या कामाचा अभिमान न मिरवता, आम्ही तुमच्या पलीकडील प्रांतांत शुभवर्तमान सांगावे.
17 १७ पवित्र शास्त्र सांगते, “पण जो कोणी अभिमान मिरवतो त्याने प्रभूविषयी अभिमान मिरवावा.”
18 १८ कारण स्वतःची प्रशंसा करणारा स्वीकृत नाही पण प्रभू ज्याची प्रशंसा करतो तोच स्वीकृत आहे.