< 2 इतिहास 15 >
1 १ ओदेदाचा पुत्र अजऱ्या याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला.
2 २ अजऱ्या आसाच्या भेटीला गेला आणि म्हणाला, “आसा मी काय म्हणतो ते ऐक. यहूदा आणि बन्यामीन लोकहो, तुम्हीही ऐका. जर तुम्ही परमेश्वराबरोबर राहिलात तर तो तुमच्याबरोबर राहील. जर तुम्ही त्याचा शोध केलात तर तो तुम्हास भेटेल. पण तुम्ही त्यास सोडलेत तर तो ही तुम्हास सोडेल.
3 ३ इस्राएलाला दीर्घकाळ पर्यंत खरा देव असा नव्हता, तसेच शिकवायला याजक किंवा नियमशास्त्र नव्हते
4 ४ पण अडचणीत सापडल्यावर इस्राएल लोक पुन्हा इस्राएलाचा परमेश्वर याच्याकडे वळाले. त्यांनी देवाचा शोध घेतला आणि त्यांना तो सापडला.
5 ५ त्या धकाधकीच्या काळात कोणीही सुरक्षितपणे प्रवास करु शकत नव्हता. सगळ्याच देशामध्ये अराजकाची स्थिती होती.
6 ६ देश असोत की नगरे सगळी एकमेकांविरुध्द लढत होती. कारण परमेश्वराने सर्व प्रकारच्या संकटानी त्यांना त्रस्त केले होते.
7 ७ पण आसा, तू व इस्राएल लोकहो तुम्ही हतबल होऊ नका, धीर सोडू नका. यहूदाने बन्यामिनांनो हिंमतीने वागा. तुमच्या सद्वर्तनाचे फळ तुम्हास मिळेल.”
8 ८ आसास या शब्दांनी आणि ओदेद या संदेष्ट्याच्या संदेशाने धीर आला. त्याने यहूदा आणि बन्यामीन येथील अमंगळ मूर्ती हटवल्या. एफ्राइमचा जो डोंगराळ प्रदेश त्याने ताब्यात घेतला होता त्या प्रदेशातल्या गावांमधल्या मूर्ती पूर्णपणे काढून टाकल्या. मंदिराच्या प्रवेशद्वारातील परमेश्वराच्या वेदीची डागडुजी केली.
9 ९ मग त्याने यहूदा आणि बन्यामीन येथील सर्व लोक तसेच एफ्राइम, मनश्शे व शिमोन वंशातील जे लोक इस्राएल राष्ट्रातून यहूदात आले होते त्यांना एकत्र बोलावले. आसाचा देव परमेश्वर त्याच्या सोबत आहे हे पाहून लोक मोठ्या संख्येने आले.
10 १० आसाच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षाच्या तिसऱ्या महिन्यात आसा आणि हे सर्व लोक यरूशलेमामध्ये एकत्र जमले.
11 ११ त्यांनी सातशे गुरे, सात हजार मेंढरे व बकरे यांचे बली परमेश्वरास अर्पण केले. ही गुरे आणि लूट त्यांनी शत्रू कडून आणली होती.
12 १२ तिथे त्यांनी जिवाभावाने परमेश्वर देवाची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या पूर्वजांचाही देव हाच होता.
13 १३ जो इस्राएलाचा देव परमेश्वर याची सेवा करणार नाही त्यास ठार करण्याचे ठरवले. मग अशी व्यक्ती लहान असो की मोठी, स्त्री असो की पुरुष
14 १४ आसा आणि हे सर्व लोक यांनी परमेश्वरापुढे शपथ वाहिली. त्यांनी मोठ्याने जयघोष केला. कर्णे आणि रणशिंगे या वाद्यांचा नाद केला.
15 १५ मनोभावे शपथ घेतल्यामुळे सर्व यहूदा लोकांस मनापासून आनंद झाला. एकचित्ताने ते परमेश्वरास शरण गेले. त्यांनी देवाचा शोध घेतला असता तो त्यांना सापडला होता. परमेश्वराने त्यांना चहूबाजूनी स्वास्थ्य दिले.
16 १६ आसा राजाने आपली आजी माका हिलाही राजमाता पदावरुन दूर केले. कारण तिने अमंगळ अशा अशेरा देवीच्या मूर्तीची स्थापना केली होती. त्याने ती मूर्ती मोडून तोडून किद्रोन खोऱ्यात जाळून टाकली.
17 १७ त्याने इस्राएलातील उच्चस्थाने काढून टाकली नाहीत तरीही आसा आमरण परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला.
18 १८ मग त्याने व त्याच्या पित्याने परमेश्वरासाठी करवून घेतलेल्या सोन्याचांदीच्या पवित्र वस्तू पुन्हा मंदिरात आणल्या.
19 १९ आसाच्या पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीत मग पुन्हा युध्द झाले नाही.