< 1 शमुवेल 27 >
1 १ दावीद आपल्या मनात म्हणाला, “कधीतरी मी शौलाच्या हातून नाश पावेन; तर पलिष्ट्यांच्या मुलखात मी पळून जावे यापेक्षा मला दुसरे काही बरे दिसत नाही; मग शौल इस्राएलाच्या अवघ्या प्रांतात आणखी माझा शोध करण्याविषयी निराश होईल आणि मी त्याच्या हातातून सुटेन.”
2 २ मग दावीद उठला आणि तो व त्याच्याबरोबर असलेली सहाशे माणसे अशी ती मावोखाचा मुलगा आखीश, गथाचा राजा याच्याकडे गेला.
3 ३ तेव्हा दावीद व त्याची सर्व माणसे एकेक आपल्या कुटुंबासहीत गथात आखीशा जवळ राहिली; दावीदाबरोबर त्याच्या दोघी स्त्रिया ईज्रेलीण अहीनवाम व पूर्वी नाबालाची पत्नी होती ती कर्मेलीण अबीगईल या होत्या.
4 ४ आणि दावीद गथास पळून गेला असे कोणी शौलाला सांगितले, मग त्याने त्याचा शोध आणखी केला नाही.
5 ५ दावीद आखीशाला म्हणाला, “तुझी कृपादृष्टी माझ्यावर झाली तर या मुलखातील कोणाएका नगरात मी तेथे रहावे म्हणून मला जागा दे; तुझ्या दासाने राजधानीत तुझ्याजवळ का रहावे?”
6 ६ तेव्हा आखीशाने त्यास सिकलाग दिले. यामुळे सिकलाग आजपर्यंत यहूदाच्या राजांकडे आहे.
7 ७ दावीद पलिष्ट्यांच्या मुलखात राहीला ते दिवस एक पूर्ण वर्ष व चार महिने इतके होते.
8 ८ दावीद आणि त्याच्या लोकांनी निरनिराळ्या ठिकाणी हल्ला करून गेशूरी, गिरजी, आणि अमालेकी यांच्यावर स्वाऱ्या केल्या; शूराकडून मिसर देशाकडे जाताना जो प्रदेश आहे त्यामध्ये ही राष्ट्रे पूर्वीपासून वसली होती.
9 ९ दावीदाने त्या प्रांतातले पुरुष किंवा स्त्री जिवंत ठेवले नाही; मग मेंढरे गुरे व गाढवे उंट व वस्त्रे ही घेऊन तो आखीशाकडे परत आला.
10 १० तेव्हा आखीश म्हणाला, “आज तू कोणावर घाला घातलास?” दावीद म्हणाला, “यहूदाच्या दक्षिण प्रदेशावर व यरहमेली यांच्या दक्षिण प्रदेशावर व केनी यांच्या दक्षिण प्रदेशावर.”
11 ११ दावीदाने गथाकडे वर्तमान आणायला पुरुष किंवा स्त्री जिवंत ठेवली नाही. त्याने म्हटले, “त्यांना जिवंत ठेवले तर ते आम्हाविषयी सांगतील व म्हणतील की, दावीदाने असे असे केले आहे.” आणि तो पलिष्ट्यांच्या मुलखांत राहिला तेव्हापासून त्याची चाल अशीच होती.
12 १२ आखीशाने दावीदावर भरवसा ठेवून म्हटले, “त्याने आपल्या इस्राएली लोकांकडून आपणाला अगदी तुच्छ मानवून घेतले आहे, म्हणून तो सर्वकाळ माझा दास होऊन राहील.”