< 1 शमुवेल 26 >
1 १ जीफी लोक शौलाकडे गिबा येथे येऊन म्हणाले, “यशीमोनासमोर हकीला डोंगरात दावीद लपला आहे की नाही?”
2 २ तेव्हा शौल उठला व आपल्याबरोबर इस्राएलाच्या तीन हजार निवडक मनुष्यांना घेऊन दावीदाचा शोध करायला जीफ रानात गेला.
3 ३ शौलाने यशीमोनासमोरील मार्गाजवळ हकीला डोंगरावर तळ दिला; तेव्हा दावीद रानात राहत होता आणि त्याने पाहिले की आपला पाठलाग करायला शौल रानात आला आहे.
4 ४ म्हणून दावीदाने हेर पाठवले आणि शौल खचित आला आहे असे त्यास समजले.
5 ५ मग दावीद उठून शौलाने तळ दिला होता त्या ठिकाणावर आला आणि जेथे शौल व त्याचा सेनापती नेराचा मुलगा अबनेर हे निजले होते ते ठिकाण दावीदाने पाहिले; शौल तर छावणीत निजला होता व त्याच्यासभोवती लोकांनी तळ दिला होता.
6 ६ तेव्हा अहीमलेख हित्ती व सरूवेचा मुलगा अबीशय यवाबाचा भाऊ यांना दावीदाने उत्तर देऊन म्हटले, “छावणीत शौलाकडे खाली माझ्याबरोबर कोण येईल?” तेव्हा अबीशय म्हणाला, “मी तुझ्याबरोबर खाली येईन.”
7 ७ मग दावीद व अबीशय रात्री लोकांजवळ गेले आणि पाहा शौल छावणीत निजला आहे व त्याचा भाला त्याच्या उशाजवळ भूमीत रोवलेला व त्याच्यासभोवती अबनेर व लोक निजलेले आहेत.
8 ८ तेव्हा अबीशय दावीदाला म्हणाला, “आज परमेश्वराने तुझा शत्रू तुझ्या हाती दिला आहे; तर आता मी तुला विनंती करतो मला भाल्याने एकदाच घाव मारून त्यास भूमीवर ठार करून दे, मी त्यास दुसरा घाव मारणार नाही.”
9 ९ पण दावीद अबीशयाला म्हणाला, “त्यांचा वध करू नकोस कारण परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकून कोण निर्दोष राहील?”
10 १० दावीद म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे; परमेश्वर त्यास मारील किंवा त्याचा मरण्याचा दिवस येईल किंवा तो खाली लढाईत जाऊन नष्ट होईल.
11 ११ मी आपला हात परमेश्वराच्या अभिषिक्तावर टाकावा असे परमेश्वराने माझ्याकडून घडू देऊ नये; परंतु आता मी तुला विनंती करतो की, तू त्याच्या उशाजवळचा भाला व पाण्याचा लोटा घे; मग आपण जाऊ.”
12 १२ तेव्हा शौलाच्या उशाजवळून भाला व पाण्याचा लोटा हे दावीदाने घेतले मग कोणाला न दिसता व कोणाला न कळता व कोणी जागा न होता ते निघून गेले कारण ते सर्व झोपेत होते. परमेश्वराकडून त्याच्यांवर गाढ झोप आली होती.
13 १३ नंतर दावीद पलीकडे डोंगराच्या शिखरावर जाऊन दूर उभा राहिला आणि त्याच्यामध्ये मोठे अंतर होते;
14 १४ तेव्हा दावीदाने लोकांस व नेराचा मुलगा अबनेर याला हाक मारली. तो म्हणाला, “अबनेरा तू उत्तर करीत नाहीस काय?” तेव्हा अबनेराने उत्तर देऊन म्हटले, “राजाला हाक मारणारा असा तू कोण आहेस?”
15 १५ मग दावीद अबनेराला म्हणाला, “तू वीर पुरुष नाहीस काय आणि इस्राएलात तुझ्यासारखा कोण आहे? तर तू आपला प्रभू राजा याच्यावर पहारा का केला नाही? कारण लोकातला कोणीएक तुझा प्रभू राजा याचा घात करायला आला होता.
16 १६ ही जी गोष्ट तू केली ती बरी नाही; परमेश्वर जिवंत आहे. तुम्ही आपला प्रभू परमेश्वराचा अभिषिक्त याला राखले नाही, म्हणून तुम्ही मरायला योग्य आहा. तर आता पाहा राजाचा भाला व पाण्याचा लोटा त्याच्या उशाजवळ होता तो कोठे आहे?”
17 १७ तेव्हा शौल दावीदाची वाणी ओळखून म्हणाला, “माझ्या मुला दावीदा ही तुझी वाणी आहे काय?” दावीद म्हणाला, “माझ्या प्रभू राजा, ही माझी वाणी आहे.”
18 १८ तो म्हणाला, “माझा प्रभू आपल्या दासाच्या पाठीस का लागला आहे? मी तर काय केले आहे? माझ्या हाती काय वाईट आहे?
19 १९ तर आता मी तुम्हास विनंती करतो माझ्या प्रभू राजाने आपल्या दासाचे बोलणे ऐकावे: परमेश्वराने तुम्हास माझ्यावर चेतवले असले तर त्याने अर्पण मान्य करावे. परंतु मनुष्याच्या संतानांनी चेतवले असले, तर ती परमेश्वराच्यासमोर शापित होवोत. कारण आज मला परमेश्वराच्या वतनात वाटा मिळू नये म्हणून त्यांनी मला बाहेर लावून म्हटले की, जा अन्य देवांची सेवा कर.
20 २० तर आता माझे रक्त परमेश्वराच्या समक्षतेपासून दूर भूमीवर पडू नये; कारण जसा कोणी डोंगरावर तितराची शिकार करतो तसा, एका पिसवेचा शोध करण्यास इस्राएलाचा राजा निघून आला आहे.”
21 २१ तेव्हा शौल म्हणाला, “मी पाप केले आहे; माझ्या मुला दावीदा माघारा ये; माझा जीव आज तुझ्या दृष्टीने मोलवान होता, म्हणून मी यापुढे तुझे वाईट करणार नाही; पाहा मी मूर्खपणाने वागून फार अपराध केला आहे.”
22 २२ मग दावीदाने असे उत्तर केले की, “हे राजा पाहा हा भाला, तरुणातील एकाने इकडे येऊन तो घ्यावा.
23 २३ परमेश्वर प्रत्येक मनुष्यास त्याचा न्याय व त्याचे विश्वासूपण याप्रमाणे परत करो. कारण आज परमेश्वराने तुम्हास माझ्या हाती दिले असता मी आपला हात परमेश्वराच्या अभिषिक्तावर टाकला नाही.
24 २४ पाहा जसा तुमचा जीव माझ्या दृष्टीने मोलवान होता, तसा माझा जीव परमेश्वराच्या दृष्टीने मोलवान होवो; आणि तो सर्व संकटातून सोडवो.”
25 २५ तेव्हा शौल दावीदाला म्हणाला, “माझ्या मुला दावीदा तू आशीर्वादित हो” तू मोठी कार्ये करशील व प्रबल होशील. मग दावीद आपल्या वाटेने गेला आणि शौलही आपल्या ठिकाणी परत गेला.